खड्डे तरी बुजवा...नाही तर नगर पंचायत तरी करा....सोशल मिडियातून महापालिकेचे वाभाडे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले असून, एकतर हे खड्डे बुजवा व ते जमत नसेल तर महापालिका बरखास्त करून नगरला नगरपंचायत करा, म्हणजे नागरी सुविधांचे प्रश्न तरी शासनाच्या निधीतून मार्गी लागतील, अशी उपरोधिक मागणी सोशल मिडियातून सध्या जोरात सुरू आहे. महापालिकेकडून नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे वाभाडे व्हॉटसअॅप पोस्टच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहेत.

खड्डेच खड्डे चोहीकडे...मनपा पदाधिकारी व प्रशासन गेले कुठे?, असा सवाल या पोस्टमध्ये करण्यात आला असून, नगर शहरातील रस्त्यांची अवस्था रस्त्यात खड्डे नाही तर खड्डयात रस्ते अशी झाल्याचा दावा केला गेला आहे. महाखड्डेच खड्डे चोहीकडे, अशी अवस्था शहराची झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष विकासाच्या मोठमोठ्या वल्गना करतो, पण साधे रस्तेही त्यांना नीट करता येत नाहीत. सध्या कोरोना काळात नगरकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेल्या मनपाचे मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याच्या कामांकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आज नगर शहरात एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाहीत. नव्याने केलेले रस्तेही दोन चार पावसातच वाहून गेले आहेत. मलिदा खाणे एवढाच एक कार्यक्रम महापालिकेत सुरू असून प्रशासनावर पदाधिकार्‍यांचा वचक राहिलेला नाही. नगरकरांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकल्यावर तरी मुर्दाड प्रशासनाला जाग यावी, हीच अपेक्षा असल्याचेही या पोस्टमध्ये आवर्जून स्पष्ट केले गेले आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगरकरांच्या प्रतिक्रियाही या पोस्टमध्ये मांडल्या गेल्या आहेत. रस्त्यांची अवस्था पाहता नगरकर कायमच खड्डयात असतात, महापौर फक्त आश्वासने देतात करीत काहीच नाहीत, बाहेरून पाहुणे येत नाहीत, नगरच्या रस्त्यावरील खड्डे पाहून, करोनामुळे आधीच हालत खराब आहे, त्यात खड्डयांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, महापालिका रद्द करून नगरपंचायत करावी, रोज अपघात होतात, गाड्या अचानक स्लिप होतात, दिवसभर नगर शहरातील रस्त्यांवर गाडी चालवल्यावर रात्री पेनकिलर घेवून झोपावे लागते.. अशा अनेकविध प्रतिक्रिया यातून व्यक्त झाल्या आहेत.

दरवर्षी गणेशोत्सव व मोहरमच्या काळात महापालिकेद्वारे रस्त्यांतील खड्डे दुरुस्तीची कामे केली जातात. गणेशोत्सव व मोहरम काळात निम्मा पावसाळा होऊन रस्त्यांची टाळण झालेली असते, अशा स्थितीत गणेश विसर्जन व मोहरम ताबूत विसर्जन मिरवणूक मार्गांवरील खड्डे आवर्जून खडी व डांबर टाकून बुजवले जातात. यंदा कोरोनामुळे गणेश विसर्जन व मोहरम ताबूत विसर्जन मिरवणुकाच निघाल्या नाहीत. परिणामी, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे दरवर्षीचे काम यंदा महापालिकेने केलेच नाही. यातून कोट्यवधीचा खर्च वाचल्याचे समाधान महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना असले तरी दुसरीकडे खड्ड्यांमुळे होणारे शारीरिक त्रास सहन करण्याची वेळ मात्र नगरकरांवर आली आहे. सोशल मिडियातून यावर चीड व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post