नातवाच्या घराकडे जाण्यास मज्जाव.. आजोबांच्या पुतळ्यासमोर शेतकरी संघटनेचे आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने शेतकरी संघटनेने खा. डॉ. विखेंचे आजोबा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर कांद्याची रांगोळी काढून कांदा निर्यातबंदी आदेशाची प्रत पेटवून देऊन राखरांगोळी आंदोलन केले. बुधवारी दुपारी लोणीत हे आंदोलन झाले.
कांदा निर्यातीस बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने त्याचा निषेध शेतकरी संघटनेने राखरांगोळी आंदोलनातून करण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडण्याच्या मागणीसाठी या खासदारांच्या घरासमोर कांद्याची रांगोळी व राखरांगोळी आंदोलनाचे नियोजन केले होते. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या घरासमोरही बुधवारी असे आंदोलन होणार होते. पण पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने पद्मश्री डॉ. विखे यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

याबाबत माहिती देताना घनवट यांनी सांगितले की, केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन जाहीर केले होते. लोणी येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकर्‍यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आवाज उठवावा व कांदा उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करावा यासाठी खासदारांच्या दारात निर्यातबंदी आदेशाची जाळुन राख करणे व कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेने केले. संघटनेचे आंदोलक सदस्य खा. डॉ. विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घराकडे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आंदोलकांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर राखरांगोळी आंदोलन केले. शेतकर्‍यांनी निवडून देलेले खासदार जर शेतकर्‍यंच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील तर शेतकरी त्यांना पुन्हा निवडून देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल, अशा पक्षांना शेतकर्‍यांनी यापुढे मतदान करू नये असे आवाहन घनवट यांनी केले. 

कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यातबंदी व कांद्याची आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला. या आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ, महादू खामकर, मधुकर शिंदे, नानासाहेब जाधव, निलेश शेडगे, जितेंद्र शहा, अंबादास चव्हाण, बन्सी इंगळे, दत्ता वाळुज, दत्तात्रय जाधव सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post