शहर शिवसेनेच्या विस्कळितपणावर अन्य पक्षीय अस्वस्थ.. राठोड श्रद्धांजली सभेत दिले गेले सल्ले

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहर शिवसेनेतील वाढती गटबाजी तसेच मनपा स्थायी समिती सभापतीपद निवडीत सेनेची फसवणूक झाल्याच्या होत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर सेनेच्या सद्यस्थितीवर अन्य पक्षीयांनी अस्वस्थता व्यक्त करीत मांडलेली खंत शहरात चर्चेची झाली आहे.

शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शहरातील व्यापारी प्रतिनिधींनीही शहर शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले. 'राठोडांच्या काळात ज्या दिमाखात शहर शिवसेना होती, तशीच आताही त्याच ताठ मानेने शहरात शिवसेना आहे, हे त्यांना (राठोड) वरून (स्वर्ग) पाहिल्यावर दिसायला हवी, त्यांची (राठोड) वेगळी फिलॉसॉफी होती, त्यावर खरे तर पीएच.डी. व्हायला पाहिजे, तो विचार आम्ही पुढे नेऊ', असे शहर काँग्रेसचा युवा नेता यावेळी बोलला आणि उपस्थितही आश्चर्यचकित झाले. कामगार सेनेच्या शहरातील एका पदाधिकाऱ्याने, 'पक्ष संघटना बळकट हवी, राठोडांनी ती बळकट केली होती. आता खिळखिळी झाली आहे, त्यामुळे पहिले संघटना बांधा व मग कोणाला आमदार-खासदार व्हायचे ते व्हा', असा घरचा आहेर स्पष्टपणे दिला. तर एका पत्रकाराने-'शिवसेनेने शहरात तडजोडीचे राजकारण करू नये', असा सल्ला दिला. 'राठोडांनी शहरात घडवलेल्या इतिहासापासून शिकले पाहिजे, त्याचे विस्मरण झाले नाही तर शहराला वैभवाचे दिवस नवे शिवसैनिक नक्कीच दाखवतील', असा विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने, (स्व.) राठोडांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना उद्देशून, 'शहराला तुमची गरज आहे, वडिलांचा वारसा तुम्ही समर्थपणे चालवा व ती ताकद तुमच्यात आहे', असेही आवर्जून सांगितले. 'शहरातील शिवसैनिकांनो, भय्यांची कमतरता आम्हाला भासू देऊ नका, आमच्यासाठी त्यांना (राठोड) पुनर्जन्म घ्यावा लागेल, त्यांचे कार्य तुम्ही चालू ठेवा', असा सल्ला एका व्यापारी संघटना प्रतिनिधीने दिला. शहर शिवसेनेच्या सद्यस्थितीबाबत अन्य पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली खंत व दिलेले सल्ले श्रद्धांजली सभेनंतर चर्चेचे ठरले.

त्यांच्या अनुपस्थितीचीही चर्चा
नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व नगरचे भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांची राठोड श्रद्धांजली सभेस अनुपस्थिती चर्चेची झाली. राठोड हयात असताना या तिघांशी त्यांचे राजकीय मतभेद होते व त्यावरून त्यांच्यात नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असत. या पार्श्वभूमीवर, भारतीय संस्कृतीत मरणांती वैराणी...असे म्हटले जात असल्याने व मरणानंतर एखाद्याविषय़ीचै वैर संपल्याचे मानले जात असताना राठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, असे मतही शिवसेनेच्या काही समर्थकांतून व्यक्त होत होते.

Post a Comment

Previous Post Next Post