नटराज कोविड सेंटरवर ताबा म्हणजे, आयत्या बिळावर नागोबा; गिरीश जाधव यांचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगर शहरात महानगरपालिकेने लक्षावधी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. हॉटेल नटराजची जागा ताब्यात घेऊन तेथे सामाजिक संस्थांचे सहाय्य घेऊन मोठ्या सुविधा उभ्या केल्या. पण आता भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. फक्त नावासाठी नटराज कोविड सेंटर एका राजकीय पक्षाने ताब्यात घेणे बेकायदेशीर असून हा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे.

कोरोनाच्या काळात सामान्यांना परवडावे म्हणून महानगरपालिकेने स्वखर्चाने हे नटराज कोविड सेंटर सुरु केले आहे. एक तर या इमारतीची घरपट्टी आणि पाणी पट्टी थकलेली आहे. ती कोटीच्या घरात घरात आहे. या ठिकाणचे लाईटबिल थकलेले असुन वीज वितरण कंपनीने या ठिकाणचे वीज कनेक्शन कट केले आहे. मग या इमारतीला वीज व पाणी आले कोठून? मनपाने जर ही इमारत ताब्यात घेऊन सुशोभीकरणासाठी मोठा खर्च केलेला असेल तर ही सुविधा आपण देत आहोत एवढे सांगण्यासाठी महापौर आणि शहर प्रमुखांनी हा प्रकार केला का? असा सवाल गिरीश जाधव यांनी विचारला आहे.

एक तर कोरोना महामारीच्या काळात भाजप नेत्यांसह महापौर राहत्या घरीच ६ महिने क्वारंटाईन होते. मार्च एप्रिल मे मध्ये शिवसेनेने अन्नछत्र चालवले. त्यावेळी मनपाने देखील अन्न छत्र सुरु केले होते. त्यावेळी भाजपचे हे नेते कोठे होते. आता परिस्थिति हाताबाहेर जात असताना मनपाने हे १०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केले आहे. मनपा अधिकारी, कर्मचारी आणि काही सामाजिक संस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार घर घर लंगर सेवा हे कोविड सेंटर चालवणार होते. त्यानुसार त्यांनी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी महापौरांच्या आग्रहास्तव हा निर्णय बदलला कसा? तसेच महानगरपालिकेने हे कोविड सेंटर चालविण्यास देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. त्याचे काय झाले. हे सेंटर मोफत असून याठिकाणी औषधे , जेवण तसेच वाफेचे मशीन गरम काढा या सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तरीदेखील केवळ आपले नाव व्हावे, यासाठी भाजपा हे सेंटर चालवीत आहे, असे सांगणे चुकीचे आहे. एका राजकीय पक्षाने सत्तेचा असा दुरुपयोग नाव कमावण्यासाठी करणे योग्य नाही, असे गिरीश जाधव यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post