'स्वीकृत'वरुन शिवसेनेत अस्वस्थता; पक्षात जातीयवाद सुरु असल्याचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी 'स्वीकृत'साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत पक्षात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले की, 1 ऑक्टोबर रोजी नगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदे भरली जाणार आहेत. आजपर्यंत स्व.अनिलभैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. म्हणूनच शहरामध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून जातीचे राजकारण पक्षात सुरु झाले आहे. यातूनच स्व.अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केले गेले. आजही स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले जात आहेत.

आपण यात लक्ष घालावे. नगर शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीयवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम सुरु केले आहे. तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे व नगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा पुढील काळात आपल्या शिवसेनेला मोठी किंमत मोजवी लागणार आहे, असे शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post