माजी नगरसेवकाकडून नागरिकांची दिशाभूल? स्टेशन रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचा विषय गाजण्याची चिन्हे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
स्टेशन रोडवरील मल्हार चौकापासून पुढे रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे गाजण्याची चिन्हे आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी मागील २ सप्टेंबरला ज्या नागरिकांनी सह्यांचे निवेदन देऊन मनपा आयुक्तांना केली होती, त्याच नागरिकांनी आता घुमजाव करीत त्या निवेदनावर आमच्या फसवून सह्या घेतल्य़ाचा दावा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवायची की नाहीत, याचा प्रश्न महापालिकेसमोर सध्या तरी नाही तर अतिक्रमणे हटवण्याची मागणी करणारे खरे कोण आहेत, य़ांचा शोध घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

मागील २ सप्टेंबरला स्टेशन रोडवरील बेकायदेशीर झोपड्या व टपऱ्यांची अतिक्रमणे तातडीने काढण्याची स्थानिक नागरिकांची मागणी व तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले होते. त्या निवेदनावर जेष्ठ नागरिक संघाचे के.डी. खानदेशे, ज्ञानेश्वर कविटकर, नूर शेख, जोशी सर, लांडगे सर, दत्तात्रय फुलसौंदर, पंडित खुडे, विजय गायकवाड, चंदू शिपनकर, सागर पोळ, अनिल कावळे, राजू झेंडे आदी स्टेशन रोड भागातील नागरिकांच्या सह्या असल्याचे सांगितले जात होते. हे निवेदन दिल्यानंतर त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर दोनच दिवसात या निवेदनाला आक्षेप घेतला गेला. 

माजी नगरसेवक सूर्यकांत खैरे यांनी नागरिकांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचा ज्येष्ठ नागरिकांनी आरोप केला. मी ज्येष्ठ नागरिक संघ आगरकरमळा अध्यक्ष के. डी.खानदेशे सांगतो की, माजी नगरसेवक सूर्यकांत खैरे यांनी प्रभागातील विकास कामाबाबत तसेच आगरकरमळा ते काटवन खंडोबारोडच्या कामाबाबत प्रभागातील नागरिकांच्या कोऱ्या लेटरपॅडवर सह्या घेऊन स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी व आर्थिक हितसंबंधासाठी नागरिकांच्या सह्याचा उपयोग करून आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे प्रभागातील झोपड्या व टपऱ्याची अतिक्रमणे व महापालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमणे काढावी यासाठी उपयोग करून घेतला. नागरिकांची दिशाभूल करून सह्यांचे पत्र आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तशी माहिती वृत्तपत्रामध्ये छापून देखील आलेली आहे. प्रभागातील नागरिकांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. आम्ही प्रभागातील विकास कामासाठी कोऱ्या लेटरपॅडवर सह्या केल्या होत्या. या चुकीच्या कामाला आमच्या नागरिकांचा पाठिंबा नाही. नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ माजी नगरसेवक सूर्यकांत खैरे निषेध करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सह्या घेऊन फसवणूक व दिशाभूल केल्याबद्दल आम्ही कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, अशी माहितीही अध्यक्ष के. डी. खानदेशे, ज्ञानेश्वर कविटकर, नुरआलम शेख, भा. ल. जोशी सर, दत्तात्रय फुलसौंदर आदींसह प्रभागातील नागरिकांनी दिली. 

दरम्यान, अतिक्रमणे काढण्याची मागणी करणे निवेदन खरे की खोटे, या वादात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे मात्र दुर्लक्षित होण्याची चिन्हे आहेत. मल्हार चौक ते शिवनेरी चौक या मार्गालगत अतिक्रमणे व झोपड्या वाढत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस टपऱ्या व दुकाने थाटली जात आहेत. आयकॉन पब्लिक स्कूल लगतची जागा प्राथमिक शाळा व क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. तसेच त्यापुढील जागा भाजी मार्केट, व्यापारी संकुल व पार्किंग म्हणून आरक्षित आहे. त्यासमवेत बारा मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम रस्ता देखील प्रत्यक्ष नकाशावर उपलब्ध आहे. मात्र, ही सर्व आरक्षणे झुगारून बेकायदेशीररित्या पत्र्याच्या टपऱ्या एका दिवसात विकसित करून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये हा भाग आरक्षित असूनही या ठिकाणी बेकायदेशीर झोपड्या व टपऱ्यांचा होणार आहे. काही महिन्यापूर्वी मोकळा असलेल्या रस्त्यावर आता अतिक्रमणे वाढत असल्याने रेल्वे स्टेशनला ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळे निर्माण होत आहे. महापालिकेच्या जागेवरील टपरी धारक दुकानदारांकडून दरमहा ७ ते ८ हजार रुपये भाडे व लाखो रुपये डिपाझीट घेत दुकानदारांची लूट करीत नवीन धंदा सुरू झाला आहे. यातून मनपाला एक रुपयाचाही महसूल मिळत नसल्याने मनपाची फसवणूक चालली आहे. शाळा-भाजी मार्केट, व्यापारी संकुल व पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या मूळ प्रश्नाकडे महापालिका लक्ष देणार की अतिक्रमण काढण्याची मागणी करणारे निवेदन खरे की खोटे, याची शहानिशा करणार, असा सवालही यातून उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post