अहमदनगर : बाजारपेठ, दुकानांच्या वेळा बदलल्या; रात्री 9 नंतर संचारबंदी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमावलीत काही प्रमाणात बदल झाला आहे. अनलॉक-४ अंतर्गत नवे नियम जारी करण्यात आले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत ते लागू राहणार आहेत. या नव्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासात मास्क वापरणे अनिवार्य म्हणजे सक्तीचे आहे. तसेच पूर्वी विविध कामासाठी बाहेर फिरण्याची असलेली सकाळी 5 ते सायंकाळी 7 ही वेळ आता आणखी दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांना बाहेर विविध अत्यावश्यक कामांसाठी फिरता येणार आहे. मात्र, 9 च्या आत घरात यावे लागणार आहे. रात्री 9 नंतर संचारबंदी असणार आहे. नवीन नियमावलीत दुकानदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत आता दुकानेे उघडी ठेवता येणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ३० सप्टेंबरपर्यंतचे कोविड नियम जारी केले आहेत. या नियमानुसार हॉटेल्स व लॉज खुले करण्यात आले असले तरी सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझेशनचे नियम तेथे लागू असणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये अ व ब दर्जाचे सर्व अधिकारी व अन्य अधिकारी आणि कर्मचारी ५० टक्के उपस्थितीला मुभा दिली गेली आहे. तसेच सरकारी व खासगी कार्यालयांतून सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझेशन उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता अधिकाऱ्याच्या नेमणुकीचे बंधन घालण्यात आले आहे. कार्यालयांत विविध कामांसाठी येणारांचे स्क्रिनिंग बंधनकारक केले गेले आहे. खासगी प्रवासी वाहतुकीलाही परवानगी दिली गेली असून, टॅक्सी व कॅबसाठी १ अधिक ३, चारचाकीसाठी १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २ प्रवासी आणि दुचाकीवर १ अधिक १ व तेही हेल्मेट व मास्कसह असण्याचे बंधन आहे. 

शाळा-महाविद्यालये, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, थिएटर, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. विवाहासाठी ५० व अंत्यसंस्कारांसाठी फक्त २० जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post