'नगर अर्बन'च्या गुन्ह्यासाठी कम्युनिस्ट उतरणार रस्त्य़ावर; बँकेवर मोर्चा नेण्याचे नियोजन सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : अडीच कोटीच्या संशयास्पद दोन एन्ट्रीसह दीड कोटीच्या मालमत्तेवर २२ कोटीचे कर्ज देण्याचा प्रकार व अन्य अनुषंगिक अनियमिततेबद्दल नगर अर्बन बँकेच्या प्रशासकांकडून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल होत नसल्याने आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष य़ासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भैरवनाथ वाकळे यांनी यासंदर्भात सोशल मिडियात पोस्ट टाकली आहे. ''#लक्षवेध-प्रशासक महाराज, अर्बंन बँक, #अहमदनगर.....अहमदनगरची वैभवशाली अर्बन बँक लुटणारी 'देशद्रोही प्रवृत्ती' जेरबंद करा ! आमची बँक वाचवा !!'' अशा आशयाच्या पोस्टद्वारे लवकरच इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून नगर अर्बन बँकेवर सभासदांचा मोर्चा नेण्याचे सुतोवाच यात त्यांनी केले आहे. मोर्चाची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही, त्यामुळे आता या मोर्चाची प्रतीक्षा बँकेच्या सभासदांना आहे.

प्रशासक येण्याआधी संचालक मंडळ कार्यरत असताना बँकेतून १ कोटी ४७ लाख व १ कोटी ३ लाख अशा दोन रकमांच्या एन्ट्री संशयास्पद असल्याने त्याबाबत चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासकांनी दिल्याचे सांगितले जाते. पण बँकेचे अधिकारी त्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली. पण त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बँकेवर मोर्चा नेण्याचे नियोजन सुरू केले आहे.

अडीच कोटींची आली चक्क नाणी
बँकेतून 2.50 कोटी गायब झाल्याच्या प्रकरणाबाबत बोलताना माजी संचालक राजेंद्र गांधी म्हणाले,या घोटाळ्यातील भ्रष्टाचारींना वाचविण्याच्या मानसिकतेतून बँकेच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, हे 2.50 कोटी बँकेत परत आले, पण ते 1-1 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात आले होते. १ रुपयांच्या एका नाण्याचे वजन किमान ४ ग्रॅम गृहित धरले तर 2.50 कोटी नाण्यांचे वजन एक लाख किलो होते व ते ठेवण्यासाठी कमीतकमी एक एकर जागा लागेल व ही नाणी मोजून घ्यायची म्हटली तरी एक महिना लागेल. म्हणजे थोडक्यात हे शक्यच नाही तरी भ्रष्टाचारींना वाचविण्याच्या मानसिकतेमधून असा विचित्र लेखी जबाब देणे म्हणजे त्या अधिकाऱ्याने त्या गुन्ह्यात स्वतःला अडकवून घेतले आहे, असा दावा गांधींनी केला. 2.50 कोटीची नाणी बँकेत कशी आणली असे पोलिसांनी विचारले तर हे अधिकारी काय उत्तर देणार, असा सवालही त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post