गांधीमुळे गांधींना मारहाण? पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल; नगर अर्बन बँकेचा संदर्भ

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
तू आमच्या गांधीसाहेबांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी देतो असे सांगून नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना मारहाण करण्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास नगर अर्बन बँकेच्या नगरमधील मुख्यालयात घडली. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. 

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त करून वर्षभरापूर्वी प्रशासक नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर 'आमचे गांधी साहेब' म्हणजे माजी खासदार दिलीप गांधी आहेत की अन्य कोणी गांधी साहेब आहेत, याची चर्चा नगरमध्ये जोरात आहे.


यासंदर्भातील माहिती अशी की, माजी संचालक राजेंद्र गांधी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास नगर अर्बन बँकेच्या मुख्यालयात गेले असताना तेथे आशुतोष लांडगे यांनी त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी मनोज गुंदेचा व एम. पी. साळवे हे साक्षीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 'तू बँकेचे फार लफडे बाहेर काढतोस, आमच्या साहेबांना त्रास देतो,' असे लांडगे म्हणाला असता राजेंद्र गांधी म्हणाले, 'मी माझे बँकेचे काम करतो. मला माझे काम करू द्या', असे त्यांना समजून सांगत असताना त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्यांनी जाता जाता, 'तू आमच्या गांधी साहेबांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी देतो, हायकोर्टात जातो, तुझा काटा काढतो', अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

दरम्यान, नगर अर्बन बँकेतील कर्जवाटपातील गैरप्रकार तसेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला केलेल्या आर्थिक दंडाला जबाबदार असलेल्यांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यासाठी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. बँकेचे वरिष्ठ अधिकारी हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आपण हा गुन्हा दाखल करण्यास तयार असल्याचेही पत्र त्यांनी बँकेला दिले आहे, पण प्रशासकांकडून त्याला मान्यता मिळालेली नाही. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही मोर्चाचा इशारा दिला होता, पण तोही अजून मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांना झालेल्या मारहाणीचा प्रकार बँकेच्या वर्तुळात चर्चेचा झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post