'या' गांधींनी दिले आता 'त्या' गांधींना आव्हान; नगर अर्बन बँकेचा गैरव्यवहार ऐरणीवर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
'एकट्याला गाठून मारणे सोपे असते, पण लोकांसमोर येऊन सत्य सांगण्याची हिंमत दाखवणे महत्त्वाचे असते, नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी व कर्जदार आशुतोष लांडगे यांनी बँकेत केलेल्या गैरव्यवहारांचे पुरावे आपल्याकडे असून, त्यांनी समोरासमोर येऊन हे पुरावे खोटे असल्याचे सिद्ध करावे', अशा शब्दात नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मंगळवारी नवे आव्हान दिले. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी लांडगे यांनी राजेंद्र गांधी यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता, त्याचे पुरावे देण्याचे व समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान गांधी यांनी लांडगे यांना दिले होते व मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता वाडियापार्कजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर येण्याचे आवाहन केले होते. पण तासभर थांबूनही लांडगे आले नसल्याने अखेर राजेंद्र गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर भूमिका मांडून माजी खासदार दिलीप गांधी व लांडगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व ते खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी समोरासमोर येण्याचेही आव्हान दिले.

''नगर अर्बन बँकेत मला (राजेंद्र गांधी) झालेल्या मारहाणीचे कारण बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचे होते, त्यांनी थकीत कर्जाची वसुली करू नये म्हणून दहशत दाखवण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे'', असा दावा करून राजेंद्र गांधी म्हणाले, ''मागील १० वर्षांपासून नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचार व गैरप्रकारांविरुद्ध आपण लढा देत आहोत. यामुळेच माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधींसह त्यांचे संचालक मंडळ बरखास्त होऊन बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. लांडगे यांच्याकडे आधीचे ६ कोटीचे कर्ज असताना त्यांना नवे कोणतेही मॉर्गेज न घेता ३ कोटीचे कर्ज दिले गेले आहे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाक दाखवून हे पैसे त्याच्या खात्यात जमा करवून घेतले आहे, बँकेने नेमलेले चौकशी अधिकारी अॅड. चंगेडे यांच्या चौकशी अहवालात व बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या ठरावातही या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले गेले असतानाही बँकेद्वारे व प्रशासकांद्वारे अजूनही पोलिसात तक्रार दिली जात नाही, हे दुर्दैव आहे'', अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ''खंडणी व मारहाण प्रकरणात बडतर्फ चेअरमन व माजी खासदार दिलीप गांधी यांचा राजकीय वरदहस्त आहे. माझ्यावर खोटे आरोप करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मी सत्याचा मार्ग सोडणार नाही व हा लढा पुढे चालू ठेवणार आहे'', असेही राजेंद्र गांधी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post