'नगर अर्बन'चा गुन्हा कागदावर येईना; अर्बन बचाव मोहीम हतबल, स्वतः फिर्यादी होण्याची दाखवली तयारी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील गैरव्यवहारांबाबत गुन्हा दाखल होतो की नाही, याचे कुतूहल मागील १५ दिवसांपासून नगरच्या राजकीय विश्वातून व्यक्त होत असले तरी संबंधित गुन्हा दाखल करण्यास बँकेच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ सुरू असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगर अर्बन बचाव मोहीम हतबल झाली आहे. गैरप्रकार दाबण्याचेच प्रकार होत असतील तर कशासाठी हे सारे करायचे, अशा उद्वेगात मोहीम आली आहे. दरम्यान, बँकेचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी होत नसतील तर आपल्याला अधिकार द्यावा, आपण फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करतो, असे पत्र बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. यावर आता त्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे.

यासंदर्भात राजेंद्र गांधी यांनी दिलेली माहिती अशी की, फेब्रुवारी 2019 च्या रिजर्व बँकेच्या तपासणी अहवालानुसार बँकेच्या तब्बल 1 कोटी 47 लाखाचा हिशोब जुळत नाही व बँकेची ही मोठी रक्कम बँकेच्या मुख्य शाखेतून बँकेच्या मार्केट यार्ड शाखेला पाठविली असे लिहिले होते, पण प्रत्यक्षात ही रक्कम मार्केट यार्ड शाखेला पोहचलीच नव्हती. मग ही रक्कम गेली कोणीकडे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रशासकांकडे तक्रार केली. प्रशासकांनी याबद्दल सखोल चौकशीची जबाबदारी बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर दिली व त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर हा 1 कोटी 47 लाखाचा अपहार झाल्याचा निष्कर्ष तर निघालाच, पण अशीच आणखी एक 1 कोटी 03 लाखाची संशयास्पद नोंद सापडली व हा अपहार एकूण 2 कोटी 50 लाखाचा असल्याचा अहवाल प्रशासकांना सादर करण्यात आला. प्रशासकांनी यावर पुन्हा एक चौकशी अधिकारी नेमून या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. या चौकशी अधिकाऱ्याने सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जाबजबाब घेतले व अपहारासाठी जबाबदार असल्याबद्दलचा काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांसह अहवाल प्रशासकांना दिला आहे. प्रशासकांनी याबद्दल पोलीस फिर्याद दाखल करणेसाठी अँड. योहान मकासरे यांची नेमणूक करून त्यांच्याकडून कायद्याचे चौकटीत बसणारी सविस्तर फिर्याद बनवून घेतली व बँकेच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला जावून फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण मागील तीन दिवसांपासून ही फिर्याद दाखल करण्याची टाळाटाळ सुरू आहे, असा दावा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला. त्यामुळे सोमवारी त्यांनी प्रशासकांना पत्र देऊन स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली.

बँकेचे अधिकारी-कर्मचारी पोलीस फिर्याद द्यायला घाबरत असतील वा कोणाच्या दबावाखाली असतील तर, प्रशासकांनी माझ्या (राजेंद्र गांधी) नावाने ठराव करून मला अधिकार दिल्यास मी बँकेतर्फे व सभासदांतर्फे फिर्याद देणेस तयार आहे, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. पोलीस फिर्याद दाखल झाल्याशिवाय बँकेची वसुली होणार नाही. बँकेच्या हितासाठी मी वाईटपणा घेण्यास तयार आहे, असे पत्र प्रशासकांना दिले असून, आता त्यावर प्रशासकांची भूमिका प्रतीक्षेत आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, नगरमध्ये गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेचा गुन्हा अजूनही कागदावर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post