नव्या सभापतींनी पक्षीय बंधने झुगारली; ते कोणत्या पक्षाचे सांगणे टाळले


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती पद स्वीकारल्यावर ते नेमके कोणत्या पक्षाचे हे सांगण्याचे त्यांनी टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थायी समितीवर भाजप कोट्यातून सदस्य म्हणून आलेल्या कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून त्यांच्याकडून सभापतिपद निवडणूक लढवली. त्यानंतर शिवसेनेचे योगीराज गाडे यांना महाविकास आघाडी धर्म पाळण्यास सांगून माघार घेण्यास लावल्यावर कोतकर बिनविरोध सभापती झाले. ते राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ.संग्राम जगताप यांनी केल्यावर भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही ते भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सभापतीपदाचा  कार्यभार स्वीकारल्यावर बोलताना, ते राष्ट्रवादीचे की भाजपचे आहेत, हे सांगण्यास त्यांनी प्रत्यक्ष नकार दिला नाही, पण या प्रश्नाकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत बोलण्याचे टाळले. पदाच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

तुम्ही भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे आहात काय, असे विचारल्यावर अमृत योजनेचे पाणी नगरला आणण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर सभापती कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्या पदग्रहण समारंभास राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेते संपत बरस्कर, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक राहुल कांबळे, मनोज दुलम, गणेश ननावरे, अजय चितळे यांनीही त्यांचा सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post