दिव्यांगांचे स्वॅब टेस्ट.. अनामप्रेमने शेअर केला जीवघेणा अनुभव


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असताना व २५ हजारापर्यंत कोरोनाबाधित झाले असताना यातील बाधित दिव्यांग व्यक्तींचे हाल बघवत नाहीत. नगरमध्ये दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अनामप्रेम संस्थेतील सदस्यांनी नुकताच स्वॅब टेस्टच्या निमित्ताने जीवघेणा अनुभव घेतला. अर्थात हा अनुभव घेताना सिव्हील हॉस्पिटलच्या यंत्रणेवरचा भयानक ताणही त्यांनी पाहिला व त्यातूनही प्रामाणिकपणे ही यंत्रणा करीत असलेल्या सेवेला सलामही केला. मात्र, यानिमित्ताने दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वॅब टेस्टिंग व उपचार सुविधा असण्याची गरजही अनामप्रेमने मांडली आहे.

अनामप्रेम संस्थेद्वारे अंध-अपंग-मूकबधीर दिव्यांगांचा सांभाळ केला जातो व त्यांना शिक्षणासह स्वावलंबी करण्याचे प्रयत्न केले जातात. या अनामप्रेम संस्थेतील एक-दोनजण कोरोनाबाधित सापडल्याने येथील सर्व दिव्यांगांच्या स्वॅबची टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या टेस्टचे अनुभव कथन अनामप्रेमचे कार्यकर्ते अजित कुलकर्णी यांनी सोशल मिडियातून केले. त्यांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र तपासणी व उपचार यंत्रणा गरजेची असल्य़ाचे मत मांडले.

अजित कुलकर्णी यांनी अनुभव कथनाचे वर्णन 'अग्निपरीक्षा 'असे केले आहे. ते यात पुढे म्हणतात, ''कोरोनाच्या कालखंडातून पुढे सरकताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील 2 आठवडे अनामप्रेमच्या कामात अनेक आव्हाने आली. अनामप्रेमची वेगवेगळी कामे देखील जोमाने सुरू असताना आज मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागली. मागील 4 दिवसात आपले 2 कार्यकर्ते कोरोना बाधित झाले. त्यांची तब्येत आता उत्तम होतेय, पण सर्वांची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वांच्या स्वॅब चाचणी करण्याचे ठरले. सायंकाळी सर्व दिव्यांग मुले-मुली, कार्यकर्ते बसने सिव्हीलला गेलो. कोणालाच काही लक्षणे नव्हती. मात्र, खासगी प्रयोगशाळेत केलेला एका कार्यकर्त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने सर्वांची सिव्हीलकडून चाचणी करण्याचे ठरले. सर्वजण आपल्या स्कुल बसने सिव्हीलला गेलो. सिव्हीलमध्ये पाऊल ठेवले आणि धो-धो पाऊस सुरू झाला. काही अस्थिव्यंग मुलींना उचलून आत न्यावे लागले. सिव्हीलमध्ये सर्वांचे केस पेपर व लिखापढी करावी लागली. यात 1 तास गेला. यात सर्व लाईट गेली. पाऊस बरसत होता. लाईट नाही. कोण बाधित व कोण नाही, हे कळेना. एकदम पावसामुळे गर्दी वाढली. कुठे बसावे ..? आपल्यातील वयस्कर कार्यकर्त्यांना कुठे उभे करावे वा बसवायचे, हे कळेना.. सगळेच पराकोटीचे त्रासदायक झाले. आपल्यातील अंध कार्यकर्ते-विद्यार्थी यांना रांगेत कसे उभे करायचे..?, हाही प्रश्न होता. पण, फक्त समोर येईल ते सहन करणे एवढेच हातात राहिले.. 1 तास यात गेला.. एवढ्यात जिथे उभे होतो, तिथे किमान 6 इंच पाणी आले. सगळ्या टेस्ट अंधारात व पाण्यात उभ्या राहून दिल्या. गंमत म्हणजे 31 लोक गेलो होतो. 10 च लोकांना स्वॅब देता आले. सिव्हीलच्या लोकांवर भयानक ताण आहे. हा ताण आम्ही काही तास अनुभवला.. स्वॅब दिला आणि बाहेर बसमध्ये आम्ही येऊन बसलो... भर पावसात व गुडघाभर पाण्यात आम्ही अनामप्रेमला आलो. इकडेही लाईट नाही.. सगळ्या अडचणीच अडचणी. सर्वांना आंघोळ करणे आवश्यक... यावरून असे लक्षात आले की, पहिल्यापासून आपण एक मागणी करतोय की, दिव्यागांच्या स्वॅब टेस्ट सुलभ झाल्या पाहिजेत. दिव्यांग जर कोरोनाबाधित झाले तर त्यांची बरे होण्याची व्यवस्था स्वतंत्र पाहिजे.. संस्था म्हणून खूप काळजी व तयारी आगामी काळात केली पाहिजे, हेही प्रकर्षाने जाणवले..सर्वांनी गंभीरपणे कोरोना हा विषय घेण्याची गरज आहे'', असेही कुलकर्णींनी यात स्पष्ट केले आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वॅब टेस्टींग व स्वतंत्र उपचार सुविधांसाठी अनामप्रेम पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post