तमाशा कलावंतांसाठी बुधवारी मुंबईत बैठक; नारायणगाव लाक्षणिक उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना व लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने उपासमार सहन करीत असलेल्या राज्यभरातील तमाशा कलावंतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. तमाशा कलावंतांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर) मुंबईत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव येथे तमाशा कलावंतांनी सोमवारी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आता २३ रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत शासनाने तमाशा कलावंतांना मदत होईल, असे निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी शासनाचे तमाशा कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील निवडक तमाशा फडमालकांसह तमाशापंढरी नारायणगाव येथे एक दिवसीय उपोषण केले. त्यावेळी खेडकर यांच्याशी मंत्री देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशातील कलाकारांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे, रघुवीर खेडकर आणि इतर काही मंडळींच्या शिष्टमंडळाने 23 सप्टेंबरला मुंबईत येऊन आपल्या मागण्या आणि म्हणणे मांडावे असे आवाहन मंत्री देशमुख यांनी त्यांना केले. जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी खेडकर यांना फळांचा रस देऊन उपोषणाची सांगता केली. मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मागील वर्षीचा तमाशाचा हंगाम कार्यक्रमाविना गेला. त्यामुळे तमाशा कलाकारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यासंदर्भात शासनाने पावले उचलावीत म्हणून हे उपोषण करण्यात आले. 

 

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, यावेळी महाकला मंडळाचे लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना वर्षा संगमनेरकर, मुसाभाई इनामदार, मालती इनामदार, कैलास नारायणगावकर, राजू बागुल, विनायक महाडिक, संजय महाडिक, सुधाकर पोटे, सीमा पोटे, अमर पुणेकर, संभाजी संक्रापुरकर, शांताबाई संक्रापुरकर, शिवकन्या बडे-नगरकर, महादेव देशमुख, जयसिंगराव पवार, महेश पिंप्रीकर, मंदा पाटील पिंपळेकर, वामनराव मेंढापुरकर आदी तमाशा फडमालक उपस्थित होते. तमाशा कलाकारांचे प्रश्न आणि मागण्या महाराष्ट्र तमाशा अभ्यास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी यावेळी मांडल्या. अनेक तमाशा कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या.

Post a Comment

Previous Post Next Post