एएमसी मिरर वेब टीम
कोपरगाव : अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील भाविकांकडून योगदान दिले जात आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध कोल्हे परिवाराच्यावतीने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी १०१ किलो तांब्याचा धातु बेलापूर येथील गोशाळा प्रमुख महेश व्यास महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांची भेट घेऊन श्रीराम मंदिर कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांच्याकडे हे तांबे देण्याची विनंतीही केली.
अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी शुभारंभ झाला आहे. श्रीराम मंदिर न्यासाने मंदिराच्या बांधकामासाठी तांब्याच्या धातूचे दान करण्याचे आवाहन केल आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोल्हे परिवाराने १०१ किलो तांबे श्रीराम मंदिरासाठी पाठवले आहे. मंदिर उभारणी करीत असताना वापरल्या जाणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ इंच लांब व ३ मिलीमीटर जाड आणि ३० मिलीमीटर रुंदीच्या सुमारे १० हजार पट्ट्या वापरल्या जाणार आहेत. मंदिर न्यासाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार यामुळे हजारो वर्षे वातावरणाचा परिणाम होवु नये अशा पध्दतीने मंदिराची रचना करण्यात येणार आहे. यासाठी भारतवासीयांनी एकात्मकतेचे प्रतीक म्हणून तांबे धातु दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नगर जिल्ह्यातून प्रतिसाद देताना कोल्हे परिवाराने १०१ किलो तांबे मंदिरासाठी पाठवले आहे.
कोपरगाव परिसरातून इच्छुक भाविकांच्यावतीने किमान एक टन तांबे पाठवण्याचा मानस सुमित कोल्हे यांनी व्यक्त करून या उपक्रमाची सुरुवात कोल्हे परिवाराच्यावतीने १०१ किलो तांबे देऊन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बेलापूरचे उपसरपंच रवीशेठ खाटोड, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्यासह माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे व परिवाराच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला.
Post a Comment