नगरच्या पाच प्रयोगशील शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; शैक्षणिक उपक्रमांचे झाले कौतुक


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महापालिका शिक्षक संघाच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात नगर जिल्ह्यातील पाच शिक्षकांसह एका शाळेचा समावेश आहे. 

नपा व मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जून कोळी यांनी या पुस्कारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील नवनाथ सखाहरी अकोलकर ( मुख्याध्यापक,श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्र.६), नवनाथ मोहन लाड (नूतन मराठी शाळा क्र.९, येवलेवस्ती राहुरी),जोत्स्ना शशांक खोजे (नगरपालिका शाळा क्र.८ संगमनेर), सुनीता भाऊसाहेब इंगळे (नगरपालिका शाळा क्र.६ कोपरगाव) व तेजस राजेंद्र वारूळे ( नगरपालिका शाळा क्र.९ कोपरगाव) या पाच शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच अहमदनगर महापालिकेच्या केडगाव येथील आय.एस.ओ.मानांकन असलेल्या ओंकारनगर शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोना संकटाचे निवारण झाल्यानंतर या पुरस्कारांच्या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.

नगर जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या पाचही शिक्षकांनी प्रयोगशील शिक्षणाला प्राधान्य देत विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे. नवनाथ अकोलकर यांनी आपल्या शाळेत संगीतमय परिपाठ,क्षेत्र भेटी, आनंद बाजार,नवरात्र-भोंडला आयोजन,वक्तृत्व-निबंध-रंगभरण-हस्ताक्षर-रांगोळी स्पर्धा, कागदकाम, मातीकाम-आकाशकंदील बनविणेसारखे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तंत्रस्नेही शिक्षक नवनाथ लाड यांनी आपल्या शाळेत पाटीमुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा,ब्लॉग निर्मिती,ॲप निर्मिती,बोलकी शाळा,इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशीप परीक्षेसाठी ॲप निर्मिती,युट्युब चॅनेल निर्मितीसारखे उपक्रम केले. शिक्षिका जोत्स्ना खोजे यांनी आपल्या शाळेत कोविड काळात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देणे, राष्ट्रीय एकता व एकात्मता यासाठी विशेष उपक्रम,विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ निर्मिती,ऑनलाईन प्रशिक्षण घेणे व देणे, ऑनलाइन पाठ घेणे, "कागदाची घडी लावी अभ्यासाची गोडी"हा नवोपक्रम राबविण्य़ास प्राधान्य दिले. शिक्षिका सुनीता इंगळे यांनी आपल्या शाळेत अध्यापनात विविध अॕपचा वापर, टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती, कृतीयुक्त अध्यापन, वैज्ञानिक खेळणी प्रदर्शन, बालरक्षक व विविध स्तरावर तज्ञ भूमिका, सीडबँक,वर्डबँक व बर्ड टेबल तयार करणे, स्वनिर्मित आॕनलाईन टेस्ट निर्मिती, व्हिडीओ व पीडीएफ निर्मिती, 'शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा' पुस्तक निर्मिती असे उपक्रम राबविले. तसेच शिक्षक तेजस वारुळे यांनी आपल्या शाळेत विज्ञान प्रदर्शन सहभाग, केंद्रस्तरीय विविध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम,टॅग क्लासरूम, बालरक्षक म्हणून काम, डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ब्लॉग निर्मिती , वेबसाइट निर्मिती, युट्यूबच्या माध्यमातून दर्जेदार साहित्यनिर्मिती, वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे असे विविध उपक्रम राबवले आहेत. जिल्ह्यातील एकमेव आदर्श शाळा पुरस्कार विजेती ठरलेल्या मनपाच्या ओंकारनगर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने डिजिटल क्लासरुम,बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, विविध दिनविशेष,टॉय बँक उपक्रम, शालेय परसबाग, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शन, कंपोस्ट खत प्रकल्प,रेन वॉटर हार्वेस्टिंग,कोविड काळात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण, मूल्यवर्धन प्रकल्प, शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट, शैक्षणिक गुणवत्ता विकास असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post