शौकिनांना झटका.. एक सिगारेट वा एक बिडी आता विसरा; राज्य सरकारने घातली सुट्या विक्रीवर बंदी

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यातील कोणत्याही पान-बिडी शॉप अथवा कोणत्याही दुकाने व आस्थापनांमध्ये यापुढे सुटी सिगारेट वा बिडी विकता येणार नाही. तसे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. यामुळे यापुढे सिगारेट वा बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकीट वा बिडी बंडल शौकिनांना विकत घ्यावे लागणार आहे. व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठीच हा आदेश काढल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी स्पष्ट केले आहे तर कॉलेजमधील तरुणच नव्हे तर तरुण मुलीही अगदी सहजपणे सिगारेट ओढताना दिसत असल्याने तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जे करणे शक्य आहे. ती सर्व पावले आरोग्य विभाग उचलत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३(जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) या अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतेवेळी पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश स्पष्ट शब्दात छापणे बंधनकारक आहे. सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला- आरोग्याच्या धोक्याची कल्पना हा उद्देश साध्य होतो. मात्र, तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले असून, सुट्या सिगारेट व बिडी विक्रीवर बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला असून पोलीस व महापालिका यांनी या आदेशाची तातडीने व कठोरपणे अमलबजावणी करण्याची अपेक्षा आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

युती शासनाच्या काळात शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली. मात्र, आजही त्याची ठोस अमलबजावणी कोणत्याही संबंधित विभागाने केलेली नाही. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबतच्या केंद्राच्या कायद्याचे पालन महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आल्यापासून कधीच करण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी सुटी सिगारेट व बिडीच्या विक्रीला याच मुद्द्यावर बंदी घातली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही महाराष्ट्रात असा आदेश आरोग्य विभागाकडून निघावा यासाठी आग्रही होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हा आदेश जारी करताना सर्व कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या तसेच हा आदेश काढताना एपिडेमिक ॲक्ट १८९७, इंडियन पिनल कोड १८६०, मुंबई पोलीस ॲक्ट १९५१, क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३, नॅशनल डिझास्टर ॲक्ट २००५ आणि केंद्राचा कायदा संदर्भित केला आहे. २४ सप्टेंबरला महाराष्ट्रातील कोणत्याही पान-बिडी शॉप अथवा कोणत्याही दुकाने व आस्थापनांमध्ये यापुढे सुटी सिगारेट वा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post