माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातंय; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काही जणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाचं नेतृत्व कोणी करावं यासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे यांच्यात कोणी फूट पाडू नये. कोणी नेतृत्व करावं यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये. दोघांनी त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. दोघंही समजूतदार असल्याने वाद होणार नाही आणि कोणी त्यासाठी प्रयत्न करु नये अशी हात जोडून विनंती आहे”.

Post a Comment

Previous Post Next Post