सभापती कोतकर यांना भाजपची नोटीस; खुलासा करण्याचे आदेश


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करुन बिनविरोध सभापती झालेल्या मनोज कोतकर यांना भाजपने नोटीस बजावली आहे. भाजपचा राजीनामा दिला आहे का? आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होता का? याबाबत जाहीर वर्तमानपत्रातून व पक्षाकडे खुलासा करावा, असे आदेश शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी दिले आहेत.

नोटीसीत म्हटले की, आपण भारतीय जनता पक्षाचे सक्रीय सदस्य आहात व अहमदनगर महानगरपालिकेची सन २०१८ साली निवडणुक होऊन सदर निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्र. १७ मध्ये सर्वसाधारण जागेवर निवडणुक लढवली व आपण निवडुन आलात. मतदारांनी आपणास मतदान करताना आपण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहात व भारतीय जनता पक्षाची धेय धोरणे आमलात आणली म्हणून निवडून दिलेले आहे. आपण भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुक लढवल्यामुळे महानगरपालिकेत निवडून आले आहात. निवडून आल्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाने जी गट नोंदणी केलेली आहे, त्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून गटनोंदणी केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून पक्षाच्या हिताविरुध्द कोणताही निर्णय घेण्याचा आपणास कायदेशीर हक्क व अधिकार नाही याची आपणास पूर्ण जाणीव व कल्पना आहे.

अहमदनगर महानगरपालिकेत दिनांक २५ सप्टेंबर रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली व त्यात आपण अर्ज भरुन बिनविरोध निवडून आलात. सदर निवडणुकीनंतर अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द होऊन त्या बातम्यांमध्ये आपण भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व स्थायी समितीच्या सभापती पदी आपली नेमणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून झाली, अशा बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. सदर बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे त्याबाबतचा खुलासा नगरवासीयांना तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिका-यांना व विशेष: भारतीय जनता पक्षाचे नगर शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र उर्फ भैया गंधे यांच्याकडे लोक विचारणा करीत आहेत. 

सबब, आपणास या नोटीसीने कळविण्यात येते की, हि नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसाचे आत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थायी समिती सभापतीपदी उमेदवार होतात का? तसेच आपण भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे किंवा काय? याबाबत त्वरीत खुलासा करावा व त्या प्रमाणे जाहिर निवेदन हे वृत्तपत्रात प्रसिध्द करावे व आपला खुलासा हा नगर शहर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष यांना त्वरीत करावा. या प्रमाणे आपण त्वरीत खुलासा न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा गंधे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post