बुरुडगाव कचरा डेपोला ग्रामपंचायतीचा हिरवा कंदील; मनपाला दिला ना-हरकत दाखला

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
बुरुडगाव येथील महापालिकेच्या कचरा डेपोला व तेथे प्रकल्प उभारण्यास बुरुडगाव ग्रामपंचायतीने मान्यता दिली आहे. महापालिकेला तसा ना-हरकत (एनओसी) दाखला ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे बुरुडगाव कचरा डेपो हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय हरित लवादात दाखल याचिकेच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. येत्या २३ रोजी हरित लवादात होणाऱ्या सुनावणीच्यावेळी महापालिकेकडून बुरुडगाव ग्रामपंचायतीच्या ना-हरकत दाखल्याबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुरुडगावला महापालिकेला कचरा डेपो आता कायम राहणार असल्याने सावेडीचा कचरा डेपो हटवून तेथे क्रीडांगण व बगिचा करण्याबाबतचा महापालिकेच्या महासभेने मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रियेला वेग येणार आहे.


नगर शहरात सव्वाशे ते दीडशे टन कचरा रोज गोळा होतो व तो बुरुडगाव आणि सावेडी कचरा डेपोवर नेला जातो. तेथे कचऱ्यातून खत निर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केली गेलेली आहे. कचऱ्याचे विलगीकरण करून खत होऊ शकणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते तसेच कचऱ्यातील लोखंड व अन्य भंगार साहित्य विकले जाते. प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक साहित्य पुनर्निमितीसाठी औद्योगिक कारखान्यांतून पाठवले जाते तर कुजला न जाणारा कचरा जमिनीखाली डम्प केला जातो. बुरुडगावच्या कचरा डेपोमुळे परिसरातील जमिनी नापीक झाल्या आहेत तसेच तेथे दुर्गंधी व प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा डेपो हटवण्याची मागणी या डेपोपासून जवळच राहणारे राधाकिसन कुलट यांनी राष्ट्रीय हरित लवादात केली आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बुरुडगावच्या कचरा डेपोत महापालिकेने १० कोटीची विविध विकास कामे केली आहे. अंतर्गत रस्ते, कचऱ्यातील घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटार, न कुजणारा कचरा डम्प करण्यासाठी लँडफिल्ड साईट, मान्सून शेड तसेच कचऱ्यातून खत निर्मिती प्रकल्प काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीत हरित लवादाने कचरा डेपोमुळे बुरुडगाव परिसरात झालेल्या प्रदूषणाचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला मागितला आहे. तर दुसरीकडे सावेडीचा कचरा डेपो बंद करून तेथे क्रीडांगण तसेच बगिचा निर्मिती करण्याचा प्रस्ताव मनपाच्या महासभेने मंजूर केला आहे. अशा स्थितीत बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला दिलेल्या एनओसीचे महत्त्व वाढले आहे. यामुळे बुरुडगाव कचरा डेपो कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच येथे कचऱ्यातून खत निर्मितीसह अन्य प्रकल्प उभारणीसही मुभा मिळाली आहे. यातून सावेडी कचरा डेपो बंद करून येथे येणारा कचराही बुरुडगाव डेपोवर नेऊन तेथे खत निर्मिती व अन्य प्रक्रिया करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या २३ रोजी हरित लवादात या प्रकरणी होणाऱ्या सुनावणीकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे. 

 

नगर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बुरुडगाव येथे गट नंबर ३४ या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी आलेल्या मागणीवरून कचऱ्यावरील प्रक्रिया योग्य पद्धतीने होणे व त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही तसेच विविध मागण्यांच्या अटीस अधीन राहून मनपा यांना सदरचा प्रकल्प उभारण्यास व कचरा डेपो सुरू ठेवण्यास बुरुडगाव ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नाही, असे ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यात स्पष्ट केले गेले आहे. मात्र, गावातील काहींनी या दाखल्याला आक्षेप घेतला आहे. बुरुडगाव कचरा डेपोविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिकेची सुनावणी सुरू असताना तसेच ग्रामसभा न घेता एवढा मोठा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मनपाने गावाला फक्त कचरा दिला आहे. मुळा डॅमचे पिण्यासाठी पाणी, रस्ता, लाइट, सीना नदीवर पूल दिलेले नाही. कचरा डेपोवर होणाऱ्या बांधकामाचा टॅक्स बुरुडगावला देऊ नका, परंतु पिण्यासाठी पाणी मोफत उपलब्ध करून द्या, गावात लाइट, सीना नदीला पुल, रस्ता या सुविधा देण्याची गरज आहे, असेही मत काहींनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post