जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी? उर्मिला मातोंडकर कंगनावर संतापली


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरुन उर्मिला मातोंडकरने संताप व्यक्त केला आहे. जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली अशी विचारणा उर्मिला मातोंडकरने केली आहे. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय असल्याची टीकाही तिने केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना उर्मिला मातोंडकरने हे वक्तव्य केलं आहे.

“मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही करुन टॅक्स भरतो. त्या करदात्यांच्या पैशातून हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती,” असं उर्मिलाने विचारलं आहे.

पुढे ती म्हणाली आहे की, “माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा तिने माझ्याकडे माफियांची नावं असून ती अमली पदार्थ विभागाला द्यायची असल्याचा दावा केला होता. सर्वात प्रथम म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुंबईसारख्या भयाण ठिकाणी तू न येता पण ते देऊ शकली असतीस. इंटरनेटवर, मेल, फोनवरुन नावं देऊ शकत होती. पण आलीस कशाला ? चिथवायला. बरं नावं दिल्यावर काय झालं ? मग आमच्या पैशांवर ही सुरक्षा कशासाठी देण्यात आली होती,” अशी संतप्त विचारणा उर्मिलाने केली आहे.

“काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, इंडस्ट्रीने कित्येक जणांना त्यांचं घर, भाकर सगळं काही दिलं आहे. हे जे काही सुरु आहे ते सगळं वाईट आहे. कंगनावर बोलणंच मला गरजेचं वाटत नाही,” असंही ती म्हणाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post