हरित लवादाच्या निर्णयाला अधीन राहून 'ती' परवानगी; बुरुडगावकरांनी स्पष्ट केली कचरा डेपोबद्दल भूमिका


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
बुरुडगाव कचरा डेपोबद्दल राष्ट्रीय हरित लवादात दाखल असलेल्या खटल्याच्या निर्णयास तसेच लवादाद्वारे दिल्या जाणाऱ्या अटी-शर्ती व कचरा प्रक्रिया क्षमतेस अधीन राहूनच बुरुडगाव कचरा डेपो आहे तेथे ठेवण्यास बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला परवानगी दिली आहे, असे स्पष्टीकरण बुरुडगावचे माजी सरपंच बापू कुलट व माजी उपसरपंच खंडू काळे यांनी दिले आहे. बुरुडगाव कचरा डेपोला बुरुडगाव ग्रामपंचायतीने ना-हरकत दाखला देताना काही अटीही घातल्या असून, त्यांची पूर्तता महापालिकेद्वारे झाली नाही तर बुरुडगावचा कचरा डेपो बंद करण्यात येणार असल्याचेही या ना-हरकत दाखल्यात स्पष्ट केले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुरुडगाव येथील महापालिकेच्या कचरा डेपोला व तेथे खत प्रकल्प उभारण्यास बुरुडगाव ग्रामपंचायतीने मान्यता दिली आहे. महापालिकेला तसा ना-हरकत (एनओसी) दाखला ग्रामपंचायतीने दिला आहे. त्याचे वृत्त 'एएमसी मिरर'द्वारे सगळीकडे प्रसारित झाल्यावर बुरुडगावमध्ये खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच कुलट व उपसरपंच काळे यांनी माहिती दिली. बुरुडगाव कचरा डेपोमुळे बुरुडगावचे वातावरण व पाणी दूषित झाल्याने मागच्या आठवड्यात ग्रामस्थांनी डेपो बंद केला होता. कचऱ्याच्या गाड्या येथे येऊ दिल्या जात नव्हत्या. त्यानंतर आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, आयक्त श्रीकांत मायकलवार यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी माजी सरपंच कुलट व उपसरपंच काळे यांच्यासह राधाकिसन कुलट, जालिंदर कुलट, अमित जाधव, नवनाथ वाघ, दिनेश शेळके, मोहन काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

गावाजवळील सीना नदीवर महापालिकेने पूल बांधून द्यावा, गावातील कचऱ्यासाठी ५ कंटेनर व कचरा कुंड्या ठेवल्या जाव्यात, यातील कचरा नियमितपणे महापालिकेद्वारे उचलला जावा, दर महिन्याला गावात व जवळपासच्या वाड्या-वस्त्यांवर निर्जंतुक औषध फवारणी केली जावी, नगर ते बुरुडगाव कचरा डेपो नवीन रस्ता करावा, त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जावे, त्यावर स्ट्रीट लाईट लावले जावेत, कचरा डेपोवर येणारी कचरा वाहतूक वाहणे सीलबंद असावी व त्यातून रस्त्यावर कचरा सांडता कामा नये, अशा विविध अटींना मान्यता दिल्याने महापालिकेला बुरुडगाव कचरा डेपोवर कचरा टाकण्यास संमती दिल्याचे कुलट व काळे यांनी सांगितले.

कर आकारणी व पाणीपट्टी वसुली
बुरुडगावचे पाणी दूषित झाल्याने बुरुडगावला महापालिकेने मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. पण त्यास महापालिकेने असमर्थता दाखवली. बुरुडगाव मनपा हद्दीबाहेर असल्याने तेथे दुप्पट पाणीपट्टी आकारून पाणी देण्याचे महापालिकेने सांगितल्यावर बुरुडगाव कचरा डेपोवर महापालिकेद्वारे होणाऱ्या विविध बांधकामांवर कर आकारणी ग्रामपंचायत करील व या करातून पाणीपट्टी वळती करून घेण्याचे तसेच राहिलेली पाणीपट्टी गावकऱ्यांकडून संकलित करून भरण्यास ग्रामपंचायतीने संमती दिल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने महापालिकेला ना-हरकत दाखला दिल्यावर महापालिकेद्वारे बुरुडगावला नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचेही सांगण्यात आले तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयास व अटी-शर्तींना अधीन राहून ग्रामपंचायतीने ना-हरकत दाखला दिल्याचेही आवर्जून सांगितले गेले. दरम्यान, आता राष्ट्रीय हरित लवादात २३ रोजी होणाऱ्या सुनावणीकडे गावकऱ्यांचे व महापालिकेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post