'तो' समज दुरुस्त करण्याची आताच वेळ : छत्रपती संभाजीराजेंनी केले आमदार-खासदारांना आवाहन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जवळपास 33% च्या वर असलेला मराठा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज मराठा समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे, अशी भावना खा. छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षण अंमलबजावणीस न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय खासदारांनी मिळून पंतप्रधानांना निवेदन देण्याच्या विषयासंदर्भातील या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना मराठा आरक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

या पत्रात खा. छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे की, आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नाविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. हे करीत असताना न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरतीमध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50% पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशाप्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ- तामिळनाडूमधील आरक्षण प्रश्नाचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे. केंद्राने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33% च्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर माझी सर्वांना विनंती आहे की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post