'पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखेच'

 


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठाकरे सरकराने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या बैठकीनंतर दिली. मात्र आता या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का?, असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत पोलीस भरती करु नये अशी मागणीही संभाजीराजेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. 

मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नसताना ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो आहे असं संभाजीराजेंनी सांगितलं. “सध्या पोलीस भरती करुन घेण्याचं वातावरण नाहीय. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. या मोर्चांना बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने ते यशस्वी झाले. आजही मराठा समाज दुखी असून त्यांना आरक्षण कसं मिळणार याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. नोकरभरती करायची असल्याच पुढच्या टप्प्यात करावी त्याबद्दल एवढ्या घाईत निर्णय घेण्याची गरज काय असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. “नोकरभरती पुढच्या टप्प्यात करावी. आजच नोकरभरती घ्यायचीय का? तुम्हाला (सरकारला) मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का? मराठा आरक्षाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकी समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहण्याची गरज असून आता पोलीस भरतीचा निर्णय घेणं म्हणजे मराठी समाजाला चिथावणी देण्यासारखंच आहे,” असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनाही व्यक्त केली नाराजी
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही पोलीस भरतीवर बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. “भरती करावीच लागणार आहे, ती थांबवता येणार नाही. पण आता लगेच ती करण्याची घाई नाही. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणावर काय होणार आहे, स्थगिती हटवू शकणार आहोत का? हे महत्त्वाचं आहे. याला एक महिनाच लागणार आहे. एक महिना उशिरा भरती झाली तर काही नुकसान होणार नाही. पण आधी झाली तर निश्चितच नुकसान होणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आजच करायची असेल तर चर्चा करा, मार्ग काढा. मराठा समाजाला आश्वस्त करा. अशी कोणतीही चर्चा न करता इतक्या गंभीर परिस्थितीत हा निर्णय घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना परिणाम काय होणार आहेत याचा विचार केला पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.

करोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. मात्र आता मराठा समाजातील नेत्यांनी या भरतीला विरोध केल्याने यासंदर्भात सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. याआधी पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार यांनी जुलैमध्ये तशी माहिती दिली होती. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.

Post a Comment

Previous Post Next Post