चीन स्थित बँकेकडून मोदी सरकारने मोठं कर्ज घेतलंय; राहुल गांधींचा गंभीर आरोप


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अधिवेशनात अनुपस्थित असले तरी सतत केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. यावेळी त्यांनी भारत-चीनमध्ये नियंत्रण रेषेवरुन सुरु असलेल्या तणावावर भाष्य करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी सैन्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा करताना आपलं सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी लष्करासोबत ? असा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टोला लगावत ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असं म्हटलं आहे. मोदींनी चिनी लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नाही असं वक्तव्य केलं त्याच्या काही दिवसांनी केंद्र सरकारने चीनमध्ये स्थित असणाऱ्या बँकेकडून मोठं कर्ज घेतल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे :
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर चीन स्थित बँकेकडून मोठं कर्ज घेतलं. त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी चीनने आपली जमीन बळकावली असल्याचं सांगितलं. आणि आता केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात घुसखोरी झालीच नाही”. ट्विटच्या शेवटी राहुल गांधी यांनी मोदी सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी अशी विचारणा केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post