अरे बाप रे.. कोरोना खासगी उपचारात ४५ लाख रुपयांच्या बिलांची जादा आकारणी?


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांकडून तब्बल ४५ लाख रुपयांची जादा आकारणी झाल्याचे प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या जादा आकारणीची भरपाई संबंधित रुग्णांना होणार काय तसेच अशी जादा आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर काय कायदेशीर कारवाई होणार, याची प्रतीक्षा आता नगरकरांना असणार आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या बिलांची तपासणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सुरू केली आहे. सहा पथकांमार्फत २८ रुग्णालयांच्या बिलांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत २८७ बिलेच तपासणी समितीकडे आली आहेत. यातील १५० बिलांमध्ये त्रुटी आढळल्या. तब्बल ४५ लाख २८ हजार ६८० रुपयांच्या जादा रकमेची आकारणी रुग्णालयांकडून करण्यात आल्याचे आत्तापर्यंतच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये २५५२ रुग्ण दाखल झाले असून, १९९५ रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे. या तुलनेत तपासणीसाठी आलेला बिलांचा आकडा अवघा २८७ असल्याने कोरोना उपचार घेऊन बरे झालेल्या सर्व रुग्णांनी भरलेल्या बिलांची तपासणी गरजेची झाली आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृती मोहीम अपेक्षित आहे.

दरम्यान, समितीकडून सुरू असलेल्या तपासणीच्या भीतीमुळे काही रुग्णालयांनी रुग्णांना बिले देण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे सांगितले जाते. काहींनी रुग्णांना पक्की बिले देण्याऐवजी साध्या चिठ्ठीवर किंवा प्रिस्क्रिप्शनच्या चिठ्ठीवर लाखो रुपयांची बिले देण्यास सुरुवात केल्याचे समजते. सावेडी उपनगरातील एका रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर असलेले हे बिल सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. प्रशासनाकडून वा तपासणी समितीकडून याची अजूनपर्यंत दखल घेतली गेलेली नाही. मात्र, संबंधित रुग्णाने तक्रार केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post