'त्यांची' ड्रग्स टेस्ट करा; ट्रम्प यांची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यावर अमली पदार्थांचे सेवन करण्याचा आरोप केला आहे. मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. बायडेन हे राजकीय चर्चांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थांचे (ड्रग्सचे) सेवन करतात असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. 

सध्या लोकप्रियतेच्या बाबतील बायडेन हे ट्रम्प यांना आव्हान देताना दिसत आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिकच्या प्राथमिक सत्रातील चर्चेत बायडेन यांनी केलेल्या कामगिरीवर टीका केली. यावेळी ट्रम्प यांनी बायडेन यांच्या वागणुकीमध्ये काहीतरी विचित्र नक्की होतं, असं म्हटलं आहे.

बायडेन यांच्यामध्ये जी सुधारणा झाली आहे त्या मागील कारण आपल्याला ठाऊक असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार बायडेन अशा काही पदार्थांचे सेवन करत आहेत ज्यामुळे त्यांना विचार करण्याची अधिक स्पष्टता येते. २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या थेट चर्चांआधी बायडेन यांची अंमली पदार्थांची चाचणी घेण्यात यावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली. मी स्वत: ही चाचणी करणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. ७४ वर्षीय ट्रम्प मागील अनेक महिन्यांपासून अमेरिकेतील मतदारांना त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या ७७ वर्षीय बायडेन हे मानसिक दृष्ट्या दुबळे असल्याचे सांगत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी असतानाच चुका करण्याची सवय बायडेन यांना असल्याचे ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. बोलताना अडखळण्याची सवय आणि पत्रकारांनी अचानक विचारलेल्या प्रश्नांबद्दल बायडेन व्यक्त करत असलेल्या नाराजीवरुन ट्रम्प यांनी हा निशाणा साधला. आम्हाला मानसिक दृष्ट्या दुबळा राष्ट्राध्यक्ष नकोय असं ट्रम्प म्हणाल्याचे एफपीने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

एकीकडे ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवरुन निशाणा साधला असतानाच दुसरीकडे स्वत: ट्रम्प मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर चीडचीड करताना दिसतात. अनेकदा ट्रम्प पत्रकारांशी अगदी विचित्र भाषेमध्ये संवाद साधताना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचेही दिसून आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post