कोरोनाचे वास्तव पाहायचे.. अमरधामला चक्कर मारा; डॉ. धामणेंचे आवाहन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : ''माऊलीतील एका भगिनीला अखेरचा निरोप देण्यासाठी अमरधाममध्ये गेलो... तिथे गेल्यावर तिथल्या नेहमीच्या माझ्या मित्राने सांगितले- डॉक्टर वेळ लागेल. अजून वेटिंगला बऱ्याच बॉड्या आहेत!..मी म्हटले... म्हणजे ? तो म्हणाला...म्हणजे, आत दोन्ही विद्युत दाहिनीत दोन बॉड्या जळतायत, अजून पाच बाजूला रचून ठेवल्यात. बाहेर तीन रुग्णवाहिकांमध्ये तीन आहेत. अजून तुम्ही आणलेली आहेच आणि सरकारी दवाखान्यातून सात बॉड्या येतायेत....सकाळपासून अंत्यसंस्कार करता करता आता थकून गेलोय. सगळ्या बॉड्या करोना पेशंटच्या ! ही त्या दिवसाची कहाणी! दररोजची वेगळी....त्याचं हे भाष्य ऐकून अस्वस्थता वाढली आणि समाजाला सांगावासं वाटंल...कोरोनाची तीव्रता आणि वास्तव अनुभवायचे असेल तर आपापल्या शहरातील स्मशानभूमीत जाऊन एकदा बघा.''....नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. राजेंद्र धामणे यांनी सोशल मिडियातून शेअर केलेला हा अनुभव सध्याचे नगरमधील कोरोनाचे वास्तव स्पष्ट करून जात आहे. डॉ. धामणे यांनी हा अनुभव शेअर करताना खासगी डॉक्टरांबद्दल सोशल मिडियातून होणाऱ्या टीकाटिपण्णीबद्दलही खेद व्यक्त केला आहे.

नगर शहर व जिल्हा मिळून कोरोना रुग्णांची संख्या आता २७ हजारापार झाली आहे. अर्थात यातील ८५ टक्क्यावर रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, ही सुखद बाब आहे. साडेतीन हजारावर रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत व आतापर्यंत ३९७जणांचे मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीतून सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोविकलांग महिलांवर उपचार करण्यासह त्यांच्या मुलांचाही सांभाळ करणाऱ्या डॉ. राजेंद्र धामणे यांना माऊलीतील एका दुर्दैवी महिलेच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांसाठी अमरधाममध्ये जावे लागले व तेथील वास्तव स्थिती त्यांनी सोशल मिडियातून मांडताना कोरोनाला कोणीही लाईटली न घेता नियमित सॅनिटायझेशन, मास्क वापरणे व सोशल डिस्टन्स राखण्याची गरजही आवर्जून मांडली.
या अनुभवात डॉ. धामणे सांगतात, ''इथली माणसं आधीच अत्यंत बेफिकीर आणि स्वार्थी. ती करोना पॉझिटिव्ह आली तरी इतरांना प्रसाद देत बिनधास्त फिरतायत. आता तर, एक नवीनच अक्कल पाजळण्याचा प्रकार वाऱ्यासारखा पसरतोय. काय तर म्हणे- खासगी डॉक्टरांनी एक करोना पेशन्ट शोधला की त्यांना आपोआप सरकारकडून दीड लाख रुपये मिळतात व हल्ली हे डॉक्टर फार पैसा कमवून पोती भारतायत ! असा तर, दुसरे एक सुहृद भेटले व म्हणाले, हे दररोजचे वाढणारे आकडे खोटे असतात. डॉक्टर लोक मुद्दाम ते वाढवतात कारण त्याना डब्ल्यु एच ओ कडून अनुदान मिळते..करोना तसा विशेष आजार नाही!...हे ऐकून डोक्याला हात लावण्याची वेळ येते. माझ्या तमाम डॉक्टर बांधवांवर ही अशी चिखलफेक करणाऱ्यांना माझी एकच विनंती आहे, कृपया करोनाची तीव्रता आणि वास्तव अनुभवायचे असेल तर आपापल्या शहरातील स्मशानभूमीत जाऊन एकदा बघा. तीव्र करोना बाधित रुग्णाला वाचवताना आणि त्याचा प्राणवायू सुरळीत करताना काय करावं लागतं याची कल्पना बाहेर सॉफ्ट टार्गेट असणाऱ्या डॉक्टरांना नावे ठेवून आणि शिवीगाळ करून होत नाही. हल्ली एखाद्या नटाला-नटीला किंवा राजकीय पुढाऱ्याला कोरोना झाला की ती ब्रेकींग न्यूज होते. सर्वसामान्य माणसं या व्यवस्थेत तडफडून प्राणवायूअभावी मरतात त्याची कुणाला गंधवार्ताही नसते. इथेही आहे रे आणि नाही रे या व्यवस्थेतील परंपरागत खेळ सुरूच आहे. अशा बिनबुडाच्या अफवा सोडणारी बेफिकीर माणसं असणाऱ्या समाजाचं काय होईल, हे देव जरी आला तरी तो सांगू शकणार नाही. त्यालाही हा समाज अफवा पसरवून बेजार केल्याशिवाय राहणार नाही. हे इथलं भयाण वास्तव स्वीकारून आता तरी आपण शहाणं व्हावं, नियमांचे पालन करावं, गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यावर सॅनिटायझेशन-मास्क-सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे पालन ही प्रत्येकाकडून अपेक्षा आहे'', असेही त्यांनी यात आवर्जून नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post