जाणत्या राजांनी तेव्हा अन्नत्याग का नाही केला; तावडेंचा पवारांना सवाल

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नव्या कृषी विधेयकावरील चर्चेच्यावेळी कृषी तज्ज्ञ म्हणवणारे जाणते राजे शरद पवार गायब होते व नंतर काँग्रेस सदस्यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देताना त्यांनीही अन्नत्याग केला, पण हाच अन्नत्याग त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी का केला नाही, असा सवाल माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे केला. उलट, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर दोनच दिवसात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पोलिस भरती जाहीर करून मराठा आरक्षणासाठीचे त्यांचे रडणे खोटे असल्याचे सिद्ध होते, असे सांगून तावडे म्हणाले, कृषी विधेयकावरील चर्चेस उपस्थित राहून पवारांनाही काही सूचना करता आल्या असत्या. नव्या कृषी विधेयकाला केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण विरोधी पक्ष करीत आहेत. केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच हे विधेयक आणले गेले होते व त्यावेळी सर्व शंकांची उत्तरे तेव्हाचे त्यांचे मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली होती. तरीही केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी तसेच नको त्या शंका काढून शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी व वर्षानुवर्षे पिचत ठेवण्यासाठी नव्या कृषी विधेयकांना विरोध होत आहे, असा दावा तावडे यांनी केला. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल भाष्य करताना तावडे म्हणाले, नाथाभाऊ भाजपचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती करणार नाही, याचा विश्वास आहे.


नगर शहर भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सावेडीच्या जॉगिंग ट्रॅक मैदानावर तावडे यांच्या हस्ते कडूलिंबाच्या झाडाचे रोपण केले. यानिमित्ताने ते नगरला आले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी खा. दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, पक्षाचे नगरचे प्रभारी मनोज पांगारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विकासाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या रुपाने हाती घेतला आहे. यातून तळागाळातील गोरगरीब जनतेला स्वावलंबी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियान समाजाच्या तळागाळापर्यंत न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. सामान्यांचे प्रश्न सामान्यांमध्ये राहूनच त्यांनी जाणून घेतले व ते सोडवण्याचे प्रयत्न केले असल्याने त्यांचा हा आदर्श पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही घेण्याची गरजही त्यांनी मांडली.

ते तेव्हाच आले असते
या कार्यक्रमात बोलताना शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचा नामोल्लेख करताना देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे नाव चुकून सत्यजित तांबे असे घेतले व नंतर त्याबद्दल माफीही मागितली. त्यानंतर बोलताना तावडे यांनी, नामोल्लेख करताना सत्यजित कदम यांचा उल्लेख स्पष्टपणे केला व सत्यजित तांबे मागच्या निवडणुकीत आपल्याकडे आले असते, असे सूचक भाष्यही केले. उपस्थितांकडून त्यावर हास्यकल्लोळ उडाला.

Post a Comment

Previous Post Next Post