यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून बनवल्या नोटा!


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून चक्क खोट्या नोटा बनवून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बहीण भावाला अटक केली असून त्यांच्याकडून १०० रुपयांच्या दराच्या ३४ नोटा जप्त केल्या आहेत.

सुनीता प्रदीप रॉय (वय २२), दत्ता प्रदीप रॉय (१८, दोघे रा. घोटावडे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सुनीता आणि दत्ता हे दोघेजण यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरातच नकली नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केला होता. १०० रुपये दराच्या नोटा छापण्याचा सपाटा या दोघा भाऊ-बहिणीने लावला होता.

मंगळवारी (दि. १५) दुपारी पाचच्या सुमारास भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता त्यांनी छापलेल्या नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते. दोघांनी भाजी खरेदी करून त्या नकली नोटा दोघांनी भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी १०० रुपये दाराच्या ३४ नोटा, दोन एच पी कंपनीचे प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण ३४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post