करोना झाल्याचं सांगून फरार झालेला पती सापडला प्रेयसीच्या घरात


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे बरेच नागरिक आपल्या घरांमध्येच अडकले आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटण्यासही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली असून, पतीनं प्रेयसीच्या भेटीसाठी करोनाची मदत घेतली. नवी मुंबईतील एका २८ वर्षीय व्यक्तीने करोना झाल्याचे पत्नीला खोटे सांगून थेट प्रेयसीचे घर गाठले. तळोजा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने प्रेयसीच्या भेटीसाठी इंदोरपर्यंत प्रवास केला. पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यानंतर हा प्रकार समोर आला.

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण मरणार आहोत, असं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं आपला मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला वाशी परिसरातील एका गल्लीत त्यांची बाईक सापडली. बाईकजवळ त्याला गाडीची चावी हेल्मेट, आणि पाकिट सापडलं. त्यानंतर त्याच्या नातेवाईकाने हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी ही माहिती दिली.

पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. पोलिसांनी करोना चाचणी करण्यात आलेल्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला. मोबाईलद्वारे ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद असल्यामुळे काहीच फायदा झाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या आठवड्यात पोलीस अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीचे इंदोर येथे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली.

पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक इंदूर येथे पोहोचले असता, ती व्यक्ती ओळख बदलून भाड्याने जागा घेवून राहत असल्याचे आढळले. त्यानंतर त्या व्यक्तीला बुधवारी पुन्हा नवी मुंबईला आणण्यात आले आणि पत्नीच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post