बनावट नोटांसह गोव्यात मजा मारायला गेले, 5 जणांना अटक


एएमसी मिरर वेब टीम 
पणजी : अनलॉक मध्ये पर्यटन उद्योग सुरु होताच इतर पर्यटकांसोबतच गैरधंदे करणारी मंडळीही गोव्यात येऊ लागले आहेत. कळंगुट येथे जुगारी पर्यटकांच्या मुसक्या आवळल्याची घटना ताजी असताना बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आली आहे. या दोन घटनांमुळे यापुढे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

पणजी पोलिसांनी कळंगुट येथील तारांकित हॉटेलवर सोमवारी धाड टाकून पंजाब येथील राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजीत सिंग, राहुल आणि अनुराग या पाच पर्यटकांना अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 2 लाख 96 हजार 400 रुपयांचे बनावट चलन जप्त केले. त्यांना पोलिस कोठडीसाठी मंगळवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने बनावट चलन देऊन आईस्क्रिम खरेदी केल्याची तक्रार पणजीतील एका आईस्क्रिम पार्लर मालकाने दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पणजीचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तक्रारदाराच्या माहितीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान संबंधितांच्या वाहनाची माहिती पोलिसांना मिळाली ज्याच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

संशयित हे कळंगुट येथील एका बॉलिवूड अभिनेत्याच्या तारांकित हॉटेलवर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सोमवारी दुपारी त्या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पथकाला 2 लाख 96 हजार 400 रुपये किमतीचे बनावट चलन मिळाले. यामध्ये 100, 200 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंजाब येथील 11 पर्यटकांना ताब्यात घेतले होते. यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची प्राथमिक चौकशी केली असता, गुन्ह्यात महिला व मुलांचा समावेश नसल्याचे उघड झाले.

चौकशीअंती पोलिसांनी राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजीत सिंग, राहुल आणि अनुराग यांना अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात भा.दं.सं. कलम 489 ए, 489 बी आणि 489 सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी मागील आठवड्यात पणजी आणि पर्वरी परिसरात बनावट चलन देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पंजाब येथील पर्यटक हरमल येथील किनार्‍यावर वाहने घेऊन वाळूत आणि थेट समुद्राच्या पाण्यात वाहने चालवत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. यात वरील संशयितांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पेडणे पोलिस स्थानकातही गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post