केंद्राकडून राज्यांची 47 हजार कोटींची फसवणूक?


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून राज्यांच्या हक्काचा जीएसटी परतावा दिला जात नाही. राज्यांची फसवणूक केली जाते याचा पुरावाच देशाच्या महालेखा परीक्षकांनी (कॅग) समोर आणला आहे. 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात ‘जीएसटी’चे नुकसान भरून काढण्यासाठी 47 हजार 272 कोटी रुपयांचा निधी कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये (सीएफआय) बेकायदेशीररीत्या ठेवला. ही रक्कम केंद्र सरकारने इतर कामांसाठी वापरली. हे कायद्याचे उल्लंघन आहे असे गंभीर ताशेरे ‘कॅग’ने आपल्या अहवालात मारले आहे. 

कशी केली फसवणूक?
जमा केलेला उपकर आणि जीएसटी मोबदल्याचा उपकर निधी याचा परीक्षणामध्ये (संदर्भ 8,9 आणि 13) ‘कॅग’ला अनेक त्रुटी दिसून आल्या आहे.

2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 47 हजार 272 कोटी रुपयांचा ‘सीएफआय’ मध्ये ठेवली आणि इतर कामांसाठी वापरली. ही राज्यांची फसवणूक आहे.

कमी रक्कम जमा करणे (शॉर्ट क्रेडिटिंग) हे जीएसटी मोबदला उपकर कायदा 2017 चे उल्लंघन आहे.

जीएसटी मोबदला उपकर कायद्यानुसार जमा करण्यात आलेला उपकर हा नॉन लेप्सेबल आहे. हा पैसा जीएसटी मोबदला निधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे. हा पैसा जनतेचा असतो. राज्यांच्या महसुलामध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी हा विशेष निधी वापरला जातो.

केंद्र सरकारने जीएसटी उपकर हा जीएसटी मोबदला निधीमध्ये ठेवण्याऐवजी ‘सीएफआय’मध्ये ठेवला आणि इतर कामांसाठी वापरला.

2018-19 च्या अर्थसंकल्पात 90 हजार कोटी ट्रान्सफर करण्यात येणार होते आणि तेवढीच रक्कम राज्यांना मोबदला म्हणून देण्यात येणार होती. 95081 कोटी जीएसटी उपकर जमा झाला, पण महसूल खात्याने फक्त 54275 कोटी ट्रान्सफर केले.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोबदला म्हणून 69 हजार 275 कोटी रुपये दिले. त्यातून 35 हजार 725 कोटींची बचत झाली. त्यानंतर पुन्हा 20 हजार 725 कोटी रुपयांचा मोबदला राज्यांना दिला गेला, पण ही रक्कम तुटपुंजी आहे.

अर्थमंत्र्यांनी काय म्हटले होते?
गेल्या आठवडय़ात लोकसभेत जीएसटी परतव्याबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपकराच्या माध्यमातून जेवढे पैसा जमा होतो तेवढा पैसा राज्यांना दिला जातो. आता उपकरच जमा झाला नाही. तसेच ‘सीएफआय’मधून राज्यांची नुकसानभरपाई कायद्यानुसार देता येत नाही असे म्हटले होते. मात्र ‘कॅग’च्या अहवालाने केंद्र सरकारचा भंडाफोड केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post