सीएनजी इंजिनात आता हायड्रोजनचेही इंधन वापरले जाणार

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
वाहतुकीसाठी पर्यायी स्वच्छ इंधनाचा वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सीएनजीच्या इंजिनांमध्ये एच-सीएनजी (हायड्रोजनचे 18% मिश्रण) च्या वापरास परवानगी दिली आहे. वाहतुकीसाठी स्वच्छ इंधने' या उपक्रमांतर्गत मंत्रालयाने आजवर विविध पर्यायी इंधने अधिसूचित केली आहेत. बीआयएस म्हणजेच भारतीय मानक संस्थेनेही, एच-सीएनजी अर्थात हायड्रोजन समृद्ध अतिदाबाखालील नैसर्गिक वायूचा वापर वाहनांचे इंधन म्हणून करण्यासाठीची मानके ( (IS 17314:2019) विकसित केली आहेत. निव्वळ सीएनजीऐवजी एच-सीएनजी वापरून धुरामध्ये होणारी घट अभ्यासण्यासाठी सीएनजीच्या काही इंजिनांची चाचणी घेण्यात आली होती.

वाहनांसाठीचे इंधन म्हणून एच-सीएनजीचा समावेश करण्याच्या दृष्टीने, 'केंद्रीय मोटार वाहन नियम 1989' मध्ये सुधारणा करण्यासाठीची अधिसूचना GSR 585 (E), मंत्रालयाने 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली. या संदर्भातील नियमांचा मसुदा गेल्या 22 जुलैला सर्वसामान्य जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. याविषयी जनतेकडून कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्या नव्हत्या.

Post a Comment

Previous Post Next Post