खुशखबर.. नगरचे पाणी यंदा वाचणार; जायकवाडी भरण्याच्या मार्गावर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर हक्क सांगणारे व दुष्काळाच्या काळात पाणी मागून नगर जिल्ह्याच्या तोंडचे पाणी पळवणारे जायकवाडी धरण यंदा चक्क भरण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत जायकवाडी धरण ९५ टक्के भरले आहे व पावसाळा अजून किमान महिनाभर असल्याने तोपर्यंत ते भरण्याची शक्यता आहे. शिवाय नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तिन्ही धरणे पाण्याने भरून ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने मुळा व प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यांतील दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा, मुकणे ही धरणेही ९० टक्क्याच्यावर भरली असल्याने गोदावरी नदीतूनही पाणी वाहते आहे. परिणामी, यंदा जायकवाडी धरण भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे यंदा नगर जिल्ह्यातील तिन्ही मोठ्या धरणांतील पाणी जिल्हावासियांनाच चाखायला मिळणार आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर हे मागील पाच वर्षांपासून पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील प्रमुख धरणांच्या परिसरात पडणारा पाऊस, तेथील धरणांतून होणारी नवीन पाण्याची आवक, धरणांतून सुरू असलेला पाणी विसर्ग याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. धरण पाणीसाठा, पाऊस, पाण्याची आवक आणि नदीत असलेला व धरणातून सोडलेल्या पाणी विसर्गाबाबतची माहिती व्हाट्सअपद्वारे फॉरमॅटमध्ये तयार करून लाभक्षेत्रातील नगर ,नाशिक, पुणे, मराठवाडा व संपूर्ण देशभरातील लोकांपर्यंत अंदाजे १०ते १५ लाख शेतकरी व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार यंदा जायकवाडी धरण लवकरच भरण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जायकवाडी धरणात सध्या ९६.९६३४ टीएमसी (९४.३९%) पाणी साठा झाला आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ७०.८९७२टीएमसी (९२.४७%) आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसार जायकवाडी धरणात किमान 65 टक्के म्हणजेच 50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा ऑक्‍टोबरमध्ये जेव्हा होईल, तोपर्यंत वरून गोदावरी धरण समूह व मुळा-प्रवरा धरण समूहांमधून पाणी सोडावे लागते, असे सांगितले जाते. यंदा मात्र जायकवाडी आताच भरण्याच्या मार्गावर असल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या ओव्हरफ्लो पाण्याव्यतिरिक्त जास्तीचे पाणी सोडावे लागणार नाही, असे तरी सध्याचे चित्र आहे.

निळवंडे-भंडारदरा व मुळाच्या लाभक्षेत्रांत समाधान
नगर जिल्ह्यातील निळवंडे, भंडारदरा व मुळा ही प्रमुख तीनही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असल्याने या तिन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील धरणनिहाय पाणीसाठा टीएमसीमध्ये असा:
१) भंडारदरा-११०३९ टीएमसी (१००%), 
२) निळवंडे -७५५४ (९०.७९%), 
३) मुळा-२५४४४ (९७.८६%), 
४) आढळा-१०६० (१००%), 
५) भोजापूर-३६१ (१००%) 
६) पिंपळगाव (जोगे)-१५५२.९४ (३९.९२%), 
७) येडगाव-१७७४.३७ (९१.२८%). 
८) वडज-११५१.३४ (९८.१२%), 
९) माणिकडोह-४२७३.६२ (४१.९८%), 
१०) डिंभे-१२१६३.३९ (९७.३४%), 
११) घोड-५६७३.६७ (९४.९०%), 
१२) मांडओहोळ-३९९.०० (१००%),
१३) घाटशीळ पारगाव-१४२.०० (३२.४९%),
१४) सीना-२४००.०० (१००%), 
१५)खैरी-४५५.०० (८५.३७%),
१६) विसापुर-५३४.९५ (५९.१३%).

सव्वा लाख हेक्टर येणार ओलिताखाली
राहुरी जवळील मुळा धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 26 टीएमसी आहे. सध्या धरण 98 टक्के भरले आहे (२५,४४४दलघफु). मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाच्या 11 दरवाजांमधून सुमारे 2000 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग मुळा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. मुळा धरणातून सोडलेले पाणी थेट जायकवाडी धरणामध्ये जाऊन पोहोचते. या धरणाच्या पाण्याद्वारे नगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यांतील सुमारे १,२५,००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते व त्याचप्रमाणे नगर शहर, नगर एमआयडीसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), नगर परिषद (राहुरी), ४ सहकारी साखर कारखाने या सर्वांना तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी देखील या धरणामधून पुरवले जाते. धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post