आमदारसाहेब, तेवढे रेड झोनचे बघा ना आता..; केके रेंजबाधित शेतकऱ्याचे आ. लंकेंना अनावृत्त पत्र

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
लष्कराच्या केके रेंज सराव क्षेत्राचे भूसंपादन होणार नसल्याची घोषणा केलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना केके रेंज बाधीत परिसरातील शेतकऱ्याने अनावृत्त पत्र सोशल मिडियातून लिहिले असून, आता केके रेंजसाठी संपादित होणाऱ्या जमिनीवर पडलेला रेड झोन उठवण्याचे तेवढे बघा, अशी विनंती त्यांना केली आहे. सोशल मिडियातून हे पत्र व्हायरल होत असून, त्याची चर्चाही रंगू लागली आहे.


पारनेरचे आमदार लंके यांनी मागील आठवड्यात दिल्ली जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली व केके रेंज लष्करी सराव क्षेत्रासाठी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील १ लाख एकर क्षेत्राचे भूसंपादन झाल्यास या तिन्ही तालुक्यातील शेतकरी देशोधडीस लागतील, असा प्रश्न मांडल्यावर केके रेंजचे नवे भूसंपादन होणार नसल्याचे आश्वासन राजनाथसिंग यांनी दिल्याचा दावा लंकेंनी केला आहे. प्रसिद्धी माध्यमांतून तशा बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील व केके रेंजमध्ये जमीन जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांपैकी एकाने सोशल मिडियातून आ. लंकेंना पत्र लिहून आता या जमिनींवर पडलेला रेड झोन उठवण्याचे काम तातडीने करण्याचे आवाहन केले आहे.


या शेतकऱ्याने आ. लंकेंना पाठवलेल्या अनावृत्त पत्रात म्हटले आहे की, 

नमस्कार, 

मी के.के.रेंजमधील बाधित शेतकरी बोलत आहे. शेतकऱ्यांनो, मी एक के.के. रेंजमधील बाधित शेतकरी आहे आणि आपल्यासमोर काहीतरी गोष्टी मी सांगू इच्छितोय जेव्हा मी काल दुपारी ऐकलं की के.के.रेंजसंदर्भात लष्कर प्रमुख समवेत व गृहमंत्रीसमवेत बैठक झाली आणि आपला चाळीस वर्षापासूनचा प्रश्न होता तो निकाली निघाला आहे, हे ऐकून मी खूष झालो. एका दिवसात जे काही झाले, ते चाळीस वर्षात नाही जमलं. नंतर आपल्या आमदार साहेबांची एका चॅनेलवरून मुलाखत बघितली आणि ती मुलाखत बघून मला थोडेसे प्रश्न पडले.कारण, मी त्यातला बाधित शेतकरी आहे आणि मला सर्व त्याच्यातली अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्यात आमदार साहेब असे म्हणतात की एक इंचही जमीन अधिग्रहण करून देणार नाही. मग साहेब आपण आपल्या मुलाखतीत म्हटले आहे, के.के. रेंज-१ आर्मीच्या ताब्यात आहे आणि मग एक इंचही जमीन अधिग्रहण करू देणार नाही असा कसा हा विरोधाभास? नंतर के.के. रेंज-२ बागायती आहे असे म्हणतात व यातील बरेच शेतकरी विस्थापित आहेत असे आपण म्हणतात. एकीकडे आपण असे म्हणतात आपल्या मुलाखतीमध्ये की के.के.रेंज-२ला माझा विरोध नाही आणि दुसरीकडे म्हणतात की लष्कराला जमीन देणार नाही, अशी दुटप्पी भूमिका कशी चालणार साहेब....नंतर तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांची टांगती तलवार मी काढलेली आहे! मग मला थोडेसे प्रश्न पडले की, ही जमीन आर्मीच्या ताब्यात आहे नंतर के.के.रेंजला तुमचा विरोध नाही, पण लष्कराला जमीन देण्यास विरोध आहे....म्हणजे नेमके काय याचे मला काहीच कळले नाही. साहेब, आपण लष्कराच्या फायरिंगकरिता आठवड्यातील दोन ते तीन दिवस फायरिंग करण्याकरिता लष्कराला परमिशन देणार आहात आणि रहदारी बंद करणार आहात. मग कसे म्हणता की तुमची (शेतकऱ्यांची) जमीन एक इंचही जाऊ देणार नाही आणि आता कोणताही विषय राहिलेला नाही. पण मग, आम्ही कसे समजायचे की आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या म्हणून. साहेब,आजही आमच्या जमिनीची खरेदी-विक्री होते, परंतु शासनाने सदर जमिनीवर रेडझोन टाकल्यामुळे ती नॉनॲग्री होत नाही. या रेड झोनबाबत आपण काय खुलासा करणार आहोत ते सांगावे साहेब. साहेब, फायरिंग ही गनची आहे की, रणगाड्याची आहे, याचा चांगला अभ्यास करा. मीटिंगमध्ये गृहमंत्र्यांनी-संरक्षणमंत्र्यांनी आपल्याला काही लेखी आश्वासन दिले असेल तर तेही आम्हाला दाखवा. लोकांना दुपटी भूमिका कळते आहे. असे खोटे बोलू नका. आता तरी आम्हा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका आणि बरं का साहेब, आम्हाला सोसायटीचं लोन मिळते, नीट अभ्यास करा...जाता जाता मला चॅनलवाल्यांनासुद्धा हात जोडून नम्रतेची विनंती आहे की, आपण आपल्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न विचारा, फक्त मुलाखती घेऊ नका आणि अजून एक महत्त्वाचे- जोपर्यंत राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून आम्हाला लेखी स्वरुपात आश्वासन पाहिजे की येथे लष्कराचा सराव होणार नाही आणि संबंधित जमिनीचा रेड झोन उठवलेला आहे व आम्हाला आमच्या जमिनी कायमस्वरूपी मिळालेल्या आहे, तोपर्यंत आमचा कोणत्याही खासदारावर, आमदारावर किंवा लोकप्रतिनिधींवर विश्वास नाही.

आपलाच

एक के.के रेंज बाधित शेतकरी

Post a Comment

Previous Post Next Post