तमाशा सम्राज्ञीच्या पुतळ्यासमोरच करणार आत्मक्लेष; तमाशा कलावंतांना मिळेना सरकारचा आधार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिथून तमाशा घडला, अन ज्या विठाबाईं नारायणगावकर यांनी तमाशा कलावंतांचे नाव जगभर पसरविले व त्यांच्याच नारायणगावातूनच तमाशा कलावंतांच्या मागण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, त्याच गावात व तेथील त्यांच्याच पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन करण्याचा पवित्रा राज्यभरातील तमाशा कलावंतांनी घेतला आहे. कोरोनामुळे राज्यभरातील सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने तमाशा कलावंतही घरी बसून आहेत, पण सरकारचा त्यांना काहीही आधार मिळत नसल्याने येत्या २१ सप्टेंबरला राज्यभरातील तमाशा कलावंतांनी तमाशा पंढरी अशी ओळख असणाऱ्या नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील तमाशा सम्राज्ञी (कै.) विठाबाई नारायणगाव यांच्या पुतळ्यासमोर लोक कलावंतांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नया पैशाचीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय लोककलावंतांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांचा या वर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही, अशी खंत या कलावंतांची आहे. राज्यातील विविध संघटनांनी यापूर्वी निवेदनाद्वारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्यापही सरकार जागे झाले नाही. त्यामुळे २१ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात विठाबाईंचे पुत्र कैलास नारायणगावकर, विठाबाईंच्या कन्या मालती नारायणगावकर, विठाबाईंचे नातू विशाल नारायणगावकर, विठाबाईंचे दुसरे पुत्र राजेश नारायणगावकर तसेच रघुवीर खेडकर आणि महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास मंडळाचे सभासद तसेच सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल आणि इतर उपोषणाला बसणार आहेत.

या आंदोलनाबाबत बोलताना रघुवीर खेडकर यांनी सांगितले की, आजपर्यंत गेली सहा महिने कलावंतांना सरकारने काहीतरी मदत करावी या उद्देशाने प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्रात लोककलावंत 45 हजार आहेत, या सर्वांचीच उपासमार चालू आहे आणि महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळ या संस्थेतर्फे सरकारला निवेदन दिले आहे आणि फोनवरून सारखा पाठपुरावा केलेला आहे. कारण, लॉकडाऊनमुळे कुठेही हलता येत नाही, त्यामुळे फोनवरूनच सर्व पाठपुरावा केला आहे, परंतु सरकारचे कलावंतांकडे लक्ष केंद्रीत झालेले नाही. त्यामुळे नाईलाजाने कलावंतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. सरकारला वेठीस धरण्याचे मत नाही, पण सरकार आमच्याकडे पहायलाच तयार नाही म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात मालती इनामदार, शांताबाई संक्रापूरकर, शाहीर संक्रापूरकर, कैलास नारायणगावकर, संजय महाडिक, संगीता महाडिक, विनायक महाडिक, राजेश नारायणगावकर, विशालकुमार नारायणगावकर, राजेश बागुल, मिथुन लोंढे, महेश बांगर व इतर पदाधिकारी उपोषणाला बसणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post