महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही : उद्धव ठाकरेंचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. अनेक लोकांना वाटतंय मिशन बिगिन अगेनमध्ये पुन्हा एकदा राजकारण केलं जातं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्या मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या.. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

गेले काही महिने आपण करोनाचा सामना करतो आहोत. हे वर्षच करोना काळात गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सुरुवातीला सर्व धर्मीयांचे आभार मानतो. सणासुदीचे दिवस असूनही सगळ्या धर्मातील लोकांनी संयम पाळून आपण सगळ्यांनी करोना काळात सहकार्य केलं त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. आयुष्याची गाडी आपण मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. करोनाचं संकट वाढता वाढता वाढे अशी या करोनाची परिस्थिती आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दोन दिवसांचं आपलं अधिवेशन पार पडलं आहे. या दोन दिवसात सर्वपक्षीयांनी चांगलं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत मास्क लावताना शिथीलता आलेली दिसते आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला वाटतं की इतर देशांमध्ये लॉकडाउन संपवला आहे पण कायदे कडक केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर दंड ठेवला जातोय. गर्दी झाली की दुकान बंद केलं जातं असे कायदे करायची गरज लागायला नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यात हे संकट हे कदाचित जगावरचं पहिलं महाभयंकर संकट आहे त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post