फोन आला आणि अखेर सेनेने घेतली माघार; राष्ट्रवादीचे कोतकर 'स्थायी'चे बिनविरोध सभापती

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपद निवडणुकीत शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे मनोज कोतकर बिनविरोध सभापती झाले. कोतकर गुरुवारीच भाजपमधून राष्ट्रवादीत आले होते व या पक्ष प्रवेशानंतर अवघ्या २४ तासात त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. शुक्रवारी भल्या सकाळी मुंबईतून गाडे यांना फोन आला व त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीची मैत्री स्थानिक स्तरावर सुरू झाल्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. पण सेनेचे उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या निधनानंतर जिल्हा शिवसेनेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेणारे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना शहर शिवसेनेला राजकीय पदाचा लाभ मिळवून देण्याच्या पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता ऑनलाईन सभा झाली. स्थायी समितीमध्ये भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेले मनोज कोतकर यांनी गुरुवारी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला व त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना सभापतीपदाची उमेदवारीही दिली. दुसरीकडे शिवसेनेकडून आधी सभापतीपदासाठी श्याम नळकांडे व विजय पठारे यांची नावे चर्चेत असताना गुरुवारी उमेदवारी दाखल करण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली, त्यामुळे योगीराज गाडे यांनी अर्ज भरला होता. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना अशा दोन्ही घटक पक्षांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने पेच निर्माण झाला होता. पण शुक्रवारी सकाळी मुंबईतील सेनेचे सचिव व वरिष्ठ नेते मिलिंद नार्वेकरांनी गाडेंना दूरध्वनी करून माघार घेण्याची सूचना केली व त्यानुसार त्यांनी सभापती निवडीची सभा सुरू झाल्यावर माघार घेतली. त्यामुळे कोतकर यांची सभापतीपदीपदी बिनविरोध निवड झाली.

आता कोतकर यांना अधिकृतपणे राष्ट्रवादीचे सदस्य करण्याच्या हालचाली सुरू होत्या. तर दुसरीकडे भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या कोतकर यांच्यावर काय कारवाई करावी, याचा खल भाजपमध्ये सुरू झाला आहे. कोतकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, भाजपने स्वतःहून तसा निर्णय घेतला तर कोतकर यांच्या नगरसेवकपदाला व राष्ट्रवादीकडून मिळवलेल्या सभापतीपदाला धोका कमी होणार आहे. त्यामुळेच आता भाजपच्या हालचालींची उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, कोतकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यावर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, नगरसेवक उपस्थित होते.

राष्ट्रवादी सत्तेत व विरोधातही
महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीकडे असून, आता स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या रुपाने मनपातील भाजपच्या सत्तेतही राष्ट्रवादीचा सहभाग झाला आहे. भाजपचा महापौर करण्यात राष्ट्रवादीने यश मिळवल्यानंतर त्याबदल्यात विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडून घेतले होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापतीपद पटकावून महापालिकेतील सत्तेचे पाचवे दालनही ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे होते, पण स्थानिक राष्ट्रवादीने भाजपचाच सभापतीपदाचा उमेदवार फोडून त्यालाच आपल्याकडून सभापती केले. राष्ट्रवादीच्या या कृतीने स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी व शिवसेना आघाडी झाल्याचे वरकरणी दिसत असले व भाजपची येथे असलेली दोस्ती राष्ट्रवादीने तोडल्याचे वाटत असले तरी राष्ट्रवादीने केलेला नवा सभापती मूळ राष्ट्रवादीचा नसल्याने व भाजपमधून आयात केलेला असल्याने तोही शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post