संरक्षणमंत्र्यांनी संसदेत माहिती लपवणं बंद करावं; ओवेसींचा हल्लाबोल

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भारत-चीन सीमाप्रश्नावरून मोठा वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत या प्रकरणी सरकारची बाजू मांडली. तसंच या प्रकरणी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. परंतु विरोधकांकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागण्यात येत आहे. दरम्यान, सरकारकडून संपूर्ण माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप करत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लोबोल केला. तसंच संसदेत संरक्षण मंत्र्यांनी कोणतीही माहिती लपवू नये, असंही ते म्हणाले.

चीननं १ हजार चौरस किलोमीटरपर्यंतच्या भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. ९०० चौरस किलोमीटर जमीन देपसांगमध्ये आहे. परंतु राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील आपल्या चर्चेत देपसांगचा उल्लेखही केला नाही. सरकारसाठी हे सोपं असेल. परंतु आता वेळ आली आहे की तुम्ही संसदेत माहिती लपवणं बंद करावं. या ठिकाणी उत्तरं देण्यास तुम्ही बांधील आहात, असं ओवेसी म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

यापूर्वीही साधला होता निशाणा
यापूर्वीही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलेलं भाषण म्हणजे एक ‘घिनौना मजाक’ आहे असं ओवेसी यांनी म्हटलं होतं. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावे देशाची क्रूर थट्टा सुरु आहे. मला सदनात बोलण्याची संमती देण्यात आली नव्हती. जर ती मिळाली असती तर मी माझी भूमिका नक्की मांडली असती असंही ओवेसी म्हणाले होते. मोदी सरकार हे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात माहीर आहे. राजनाथ सिंह यांनी असं वक्तव्य केलं की आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा दलांसोबत असलं पाहिजे. संसदेचा प्रत्येक सदस्य सुरक्षा दलांसोबत आहेत याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही असंही ओवेसी यांनी म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post