मंत्री गडाख म्हणतात.. तेव्हाच झाला होता कोतकरांचा निर्णय

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड करण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच मुंबईत महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या बैठकीत झाल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीत राज्यात सगळीकड़े स्थानिक स्तरावरही महाविकास आघाडी करण्याचे ठरवले गेले होते. तिन्ही पक्षांचे नेते व समर्थक स्थानिक स्तरावर हळूहळू एकत्र येत असून, त्याची सुरुवात स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कोतकर यांच्या निवडीतून सुरू झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत अर्ज भरला असला तरी राजकारणात उमेदवारी अर्ज भरला म्हणजे निवडणूकच झाली पाहिजे, असे काही नसते. आम्ही सर्वजण समन्वयाने एकत्र काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याची सुरुवात आज झाली. यापुढे ती अधिक बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येतील.

दरम्यान, राष्ट्रवादीला सभापतीपदाच्या बदल्यात आगामी महापौरपद शिवसेनेला देण्याबाबत निर्णय झाला काय, याबद्दल विचारले असता, मंत्री गडाख यांनी स्पष्टपणे त्यावर भाष्य केले नाही. स्थानिक स्तरावर एकत्र येण्यास आमची सुरुवात झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीस अजून बराच वेळ आहे. पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे आपापल्या परीने प्रयत्न सुरू असतात, योग्य वेळ आल्यावर त्यावर (महापौरपद) निर्णय होईल व तो निर्णयही तिन्ही पक्षांच्या समन्वयातूनच होईल, असेही गडाख म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post