कांद्यासाठी आंदोलन करणारे मागील सहा महीने कुठे होते? आ. विखेंचा सवाल


एएमसी मिरर वेब टीम
राहाता : कांदा निर्यात बंदी उठवावी ही सर्वांचीच मागणी असून याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला लक्ष करणार्या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महीन्यात शेतकऱ्यांना कोणती मदत केलीॽ असा सवाल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जिल्ह्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून निर्यात बंदी उठवावी आशी मागणी केली असल्याचे स्पष्ट करतानाच  आ.विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकार मागे घेईल तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले दायित्व का निभावत नाही? केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

आज कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचे भांडवल करुन महाविकास आघाडी सरकार रस्त्यावर येवून करीत असलेल्या आंदोलनांवर टिका करुन आ.विखे म्हणाले की, सहा महीन्यांपासून राज्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. करोनामुळे बाजार समित्या बंद राहील्या. शेती उत्पादीत मालाला भाव नाही. शेतकऱ्यांनी कवडी मोल भावाने आपला माल विकला. तेव्हा महाविकास आघाडी मधील मंत्री आणि नेते झोपले होते काॽ ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर युरीया खताची टंचाई होती. सोयाबीन बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली. तेव्हा आजचे आंदोलन करणारे कुठे होतेॽ असे प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारकडून मागील सहा महीन्यात शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाही. केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेईपर्यत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना मदत करावी, अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

राहात्याचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराजांच्या मंदीरात झालेल्या चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आ.विखे पाटील यांनी सांगितले की, मंदीरे सुरू झाली असती तर मंदीरांच्या व्यवस्थापनाचा कारभार सुरळीत सुरू झाला असता. भाविकांची वर्दळ वाढली असती. पण सरकारचे धोरण स्पष्ट नसल्यानेच मंदीरातील शांतता आता चोरांच्या फायद्याची ठरत आहे. सरकार अनलाॅकची भाषा करते. माॅल आणि मदीरालय उघडायला परवानगी देते. मंदीरांबबातच निर्णय करण्यात उदासिन असलेले महाविकास आघाडी सरकार भाविकांच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप करून जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा वेळ फक्त अधिकार्यांच्या बदल्यांसाठी खर्च होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

नगर मनमाड मार्गाच्या संदर्भात यापूर्वी प्रशासनाचे लक्ष आपण वेधले होते. रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे सांगण्यात येते. मग काम सुरू का होत नाही? जनतेची सहनशीलता आता संपली आहे. या सरकारला आंदोलनाचीच भाषा कळत असेल, तर रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उतरूनच आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला. तसे पत्रही मी आधीच दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदीरातील चोरीबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत अधिकार्याकडून आ.विखे पाटील यांनी माहीती घेवून विश्वस्तांशी चर्चा केली. याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक भोई, राजेंद्र पिपाडा, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल बोठे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सागर सदाफळ, मुकूंदराव सदाफळ, बापुसाहेब आहेर, रघूनाथ बोठे, कैलासराव सदाफळ, वाल्मिकीराव गोर्डे, अॅड.तेजस सदाफळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post