ऐका हो ऐका.. आमदारावर लिवा निबंध अन् मिळवा पैका.. रोहितदादांच्या वाढदिवसाची स्पर्धा उडवतेय धूम


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम...अशा राष्ट्रीय पुरुषावरील निबंध ऐकीवात होते व किमान त्यानिमित्ताने राष्ट्रपुरुषाचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांकडून अभ्यासले जात होते. पण आता राजकारणातील बदलते ट्रेंड व्यक्तिप्रेमाचा नवा आविष्कार घडवू लागले आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड राष्ट्रवादीने विशेष निबंध स्पर्धा आयोजित केली असून, 'मी पाहिलेले रोहितदादा', 'माझा नेता माझा अभिमान-रोहितदादा' व 'महाराष्ट्र उद्याचं भविष्य-रोहितदादा' अशा तीन विषयांवर स्पर्धकांना येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत निबंध पाठवण्याचे आवाहन केले गेले आहे. अर्थात ही आगळीवेगळी निबंध स्पर्धा केवळ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वांसाठी खुली आहे. पण एखाद्या कर्जत-जामखेडबाहेरील 'रोहितदादा प्रेमी'ने जरी निबंध पाठवला तरी तो स्वीकारण्याची तयारी ठेवली गेली आहे. स्पर्धकांना पीडीएफ स्वरुपात निबंध पाठवायचे असून, विजेत्या निबंधाला ७ हजार, दुसऱ्या क्रमांकास ५ हजार व तृतीय क्रमांकास ३ हजाराचे बक्षीस तसेच प्रत्येकी ५०० रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत. सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेची माहिती सोशल मिडियातून धूम उडवत असून, त्यावर खुमासदार चर्चा झडत आहेत, राजकारणाचा दर्जा, राजकीय नेत्यांचे भक्त, राजकारणातील व्यक्तिस्तोम व व्यक्तिप्रेम यावर उलटसुलट टीकाटिपण्णीही होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू असलेले युवा नेते रोहित पवार कर्जत-जामखेडचे आमदार झाल्यापासून या दोन्ही तालुक्यातील त्यांचे समर्थक खूषीत आहेत. रोहितदादांनाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही, सर्व विषयावर ते त्वेषाने बोलतात, अर्थात देशाच्या राजकारणातील वजनदार व अभ्यासू नेते शरद पवारांचे नातू असल्याने रोहितदादांनाही कोणत्याही विषयावर बोलण्याचा अभ्यास व अधिकार असल्याचे मानले जाते. बहुदा याच त्यांच्या कौशल्याचे कौतुक कर्जत-जामखेडच्या नागरिकांना व विशेष करून त्यांच्या समर्थकांना असावे, त्यामुळेच राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचा गौरव समर्थकांकडून नेहमी होतो. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या येत्या २९ सप्टेंबरला असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीची निबंध स्पर्धा राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नागेश गवळी, जामखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल गिरमे, उपाध्यक्ष गणेश म्हस्के व वसीम सय्यद यांच्यासह अन्य समर्थकांनी आयोजित केली आहे. स्पर्धेत येणाऱ्या निबंधांपैकी निवडक निबंधांचे पुस्तकही करण्यात येणार असून, खुद्द रोहितदादांच्या हस्तेच त्याचे प्रकाशन केले जाणार आहे. त्यामुळे निबंध स्पर्धेचा हा घातला गेलेला घाट खुद्द रोहितदादांच्या संमतीनेच असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेसाठी निबंध पाठवणारांना वयाचे कोणतेही बंधन नाही, त्यांनी हजार ते बाराशे शब्दातील रोहितदादा पवारांवरील निबंध ७३५००७०३०३ या क्रमांकावर पीडीएफ स्वरुपात पाठवण्याचेही स्पष्ट केले गेले आहे.

सोशल मिडियातून टीकाटिपण्णी
राजकारणात व्यक्तिस्तोम वा व्यक्तिप्रेम नवे नाही. नगर जिल्ह्यातील राजकारणीही स्वतःचे वाढदिवस दणक्यात साजरे करतात, त्यांचे समर्थक रक्तदान शिबिरे, वृक्षारोपणे, खाऊ व फळे वाटप यासारख्या स्पर्धांसह निबंध स्पर्धाही राष्ट्रपुरुषांच्या जीवन चरित्रावर घेतात. स्वतःच्या जीवनावर निबंध स्पर्धा कोणी कधी घेतल्याचे ऐकिवात नाही व घेतल्या असतील तरी त्या काळात सोशल मिडिया नसल्याने त्यानिमित्ताने व्यक्तिप्रेम व व्यक्तिस्तोम यावर चर्चा झडली नसेल. पण आता सोशल मिडिया व्यक्तिप्रेम व व्यक्तिस्तोमाच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या प्रकारांचे भांडाफोड करताना वाभाडे काढण्यातही मागे-पुढे पाहात नाही. यात विरोधक तुटून पडतात व समर्थक तळी उचलतात, असे दृश्य नेहमी असते. या पार्श्वभूमीवर रोहितदादा पवारांच्या जीवनावरील निबंध स्पर्धाही सोशल मिडियातून खुमासदार चर्चा घडवू लागली आहे. 'निबंध स्पर्धेचे विषय अंधश्रध्दा निर्मुलन, समाजपरिवर्तन करणारे व देशाला दिशा देणारे ठेवण्याची गरज असताना स्वतःवर ठेवण्याची डेरींग कशी काय होत असेल राव?', असा सवाल एकाने विचारला आहे तर त्यावर 'सगळ्या पार्टीमध्ये असे भक्त असतात', अशी टिपणी दुसऱ्याने केली आहे. काहींनी, 'नगर शहरातही अशी स्पर्धा घेण्याची गरज व्यक्त करताना नगरच्या गल्लीबोळातील नेते-युवानेत्यांच्या नावाने स्पर्धेचे असे विषयही मांडून' त्यावर टीकाटिपणी करीत खुमासदार चर्चा रंगवली आहे. या पार्श्वभूमीवर आ. रोहितदादा पवारांच्या जीवनावर निबंध स्पर्धा कर्जत-जामखेडला किती चर्चेत आहे, हे समजले नसले तरी नगर शहरातील सर्वपक्षीय राजकारण्यांमध्ये मात्र टाईमपास चर्चेचा विषय झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post