'त्या' इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करा; आरोग्यमंत्र्यांचे आदेश, आमदार जगतापांनी वेधले लक्ष


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले.

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातील रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा संपला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जाहीर केले आहे. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये देखील रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. अशा रुग्णांचा जीव या इंजेक्शनअभावी धोक्यात आला आहे. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांची धावपळ होत आहे.

महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांना मोठ्याप्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. मात्र अहमदनगर जिल्ह्याला त्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यात लक्ष घालुन जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री टोपे यांनी त्वरीत इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post