मोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करणं खेदजनक : रोहित पवार


 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा खेद वाटत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी अशाप्रकारे त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणं किंवा मीम वापरणे हे भारतीय संस्कृतीला साजेसं नाही असंही रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?
ज्या युवाशक्तीच्या जोरावर आपण महासत्ता बनण्याचं स्वप्न आपण बघत होतो, आज ती युवाशक्ती बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ७० वा वाढदिवस साजरा केला, मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त समाज माध्यमातून राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा मला खेद वाटतो. देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्याविरोधात हॅशटॅग चालवणं किंवा मीम वापरणं आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसं नाही. एकप्रकारे पंतप्रधान पदाचा हा अवमानच आहे. विशेषतः काल सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे किंवा मीम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनातील बेरोजगारीच्या विळख्यात अडकेली युवा पिढी होती. मात्र काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी हा देशातील युवकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे युवक निराश झाले आहेत हे दिसून आलं.

जागतिक कामगार संघटनेनुसार करोना काळात जवळपासस ४१ लाख युवकांचे रोजगार गेले आहेत.सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात २.१० कोटी लोकांचे पगारी जॉब गेले असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत.त्यांना नोकऱ्या मात्र मिळत नाहीतअशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढवली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्स मध्ये दाखल होत असतात. परंतु ६५ ते ७५ % युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असून ही अपेक्षित रोजगार मिळत नाही.एकूणच गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर फारसं काम झालेलं नाही हे स्पष्ट होतं. करोना काळात काम करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत या बदललेल्या नव्या पद्धतीना अनुसरून आपल्याला येणाऱ्या काळात कौशल्य कार्यक्रम राबवावे लागतील.

१० वी नंतर जवळपास ४०% विद्यार्थी हे शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात ,या विद्यार्थ्यांकडे कौशल्य नसतात ,येणाऱ्या काळात अशा युवकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो ,त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. नोटबंदी त्यानंतर घाईघाईत लागू केलेला जीसटी तसेच सुस्पष्ट धोरणांचा अभाव यामुळे औद्योगिक क्षेत्र आधीच संकटात सापडले होते आणि त्यात कोरोनाच्या संकटाने अधिक भर घातली आहे.

असंघटित क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांनी कर्ज काढून स्वताचे छोटे मोठे व्यवसाय, तर काही तरुणांनी ऑटो रिक्षा, टॅक्सी यांचा व्यवसाय सुरू केले, परंतु आज ही सर्व लोकं अत्यंत मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत .ज्याप्रमाणे मोठ्या कंपन्याचे कर्ज पुनर्गठन करण्यासंदर्भात विचार होत आहेत. त्याप्रमाणे आपल्याला छोट्या व्यावसायिकांचा देखील विचार करणे गरजेचे आहे

Post a Comment

Previous Post Next Post