महावितरणमधील नऊ हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : कोरोना महामारीमुळे ओढवलेल्या आर्थिक चणचणीचा सामना करण्यासाठी महावितरणने कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये काम करणाऱया कंत्राटी कामगारांना बसणार आसून जवळपास नऊ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या महामारीच्या संकटात दुसरे काम मिळवायचे कसे, असा प्रश्न संबंधितांसमोर उभा राहणार आहे.

महावितरणमध्ये एकूण पदांपैकी सुमारे 25 हजार पदे रिक्त आहेत. 2016च्या परित्रकानुसार रिक्त पदांच्या 95 टक्के पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीअंतर्गत राज्यभरात 18 हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. यामध्ये वीज उपकेंद्र चालक, लिपिक, टेलीफोन ऑपरेटर, शिपाई, लाइन हेल्पर या पदांचा समावेश आहे. साध्या कोरोना महामारीमुळे महावितरणही आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. त्यानुसार रिक्त असलेल्या पदांपैकी केवळ 50 टक्के पदे कंत्राटी तत्त्वावर ठेऊन उर्वरित कामगारांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मासिक 12-17 हजार रुपये एवढा कमी पगार असलेल्या जवळपास नऊ हजार कामगारांच्या कामावर गदा येणार आहे.

महावितरणच्या सेवेवर परिणाम होणार
महावितरणमध्ये 25 हजार रिक्त पदे असून त्यांचे काम कंत्राटी कामगार करत आहेत. पण तो आकडा आता अर्ध्यापर्यंत खाली येणार असल्याने त्याचा थेट परिणाम महावितरणच्या वीज वितरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामावर होणार असल्याची खंत वीज कामगार व्यक्त करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post