भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आ. संग्राम जगताप

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
स्थायी समितीचा नवा सभापती आयात की, ओरिजनल हा भागच आता राहिला नाही. आम्ही जे ठरवले ते घडवले आहे, अशी प्रतिक्रिया शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सभापती निवडणुकीनंतर दिली. भाजपचे अजूनही अनेक नगरसेवक आमच्यात (राष्ट्रवादी) येण्यास तयार आहेत व आमच्या संपर्कातही आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

स्थायी समिती सभापती निवडीत जे घडले ते उघडपणे घडले आहे. वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणाचीही काही अडचण राहिली नाही. भाजपने सभापतीपदाचा कोण उमेदवार ठरवला होता, हा विषय आमचा नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

आ. जगताप यांनी मानले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार

महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या चर्चेतून योग्य निर्णय झाला. चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे. असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. अहमदनगर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शशिकांत गाडे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. यापुढचे निर्णय उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र बसून घेतील. त्याला आमच्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि त्यांचा निरोप मिलिंद नार्वेकर यांचं अजित पवारांशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला मिळाला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post