मागच्या सहा महिन्यात चीनने घुसखोरी केलेली नाही, गृहमंत्रालयाची राज्यसभेत माहिती


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
मागच्या सहा महिन्यात चीनने घुसखोरी केलेली नाही असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी राज्यसभेतील सदस्यांना सांगण्यात आले. मागच्या सहा महिन्यात भारत-चीन सीमेवर घुसखोरीची घटना घडलेली नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लिखित उत्तरात सांगितले. राज्यसभेतील भाजपा खासदार डॉ. अनिल अग्रवाल यांच्या प्रश्नावर नित्यानंद राय यांनी हे उत्तर दिले.

राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना घुसखोरी या शब्दाचा वापर केला नव्हता. १९९३ ते १९९६ दरम्यान दोन देशांमध्ये झालेल्या कराराचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अनादर केला असे राजनाथ म्हणाले होते. घुसखोरी, अतिक्रमण आणि आक्रमण या शब्दांमध्ये फरक असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

दहशतवादी नियंत्रण रेषा पार करतात, त्यावेळी घुसखोरी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे घुसखोरी झाले हे म्हणणे चुकीचे आहे असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. पूर्व लडाख आणि गोग्रा, काँगका ला, पँगाँग सरोवरचा उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर संघर्षाची स्थिती आहे असे राजनाथ सिंह यांनी काल लोकसभेत सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आज चीन सीमेवर घुसखोरी झाली नसल्याची माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post