रशियन लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका व्यक्तीवर साइड इफेक्ट

 


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
‘स्पुटनिक व्ही’ लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साइड इफेक्ट आढळून आले, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली. अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साइड इफेक्टचे स्वरुप होते. ‘द मॉस्को टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

‘स्पुटनिक व्ही’ लशीचे पहिल्या दोन फेजच्या चाचणीचे निष्कर्ष लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. पहिल्या दोन फेजमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर साइडइफेक्ट आढळून आले नाहीत तसेच सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात करोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.

“जवळपास १४ टक्के लोकांनी अशक्तपणा आणि स्नायुंमध्ये वेदनेची तक्रार केली. २४ तासांसाठी त्यांना हा त्रास जाणवला तसेच शरीराचे तपामान सुद्धा वाढले” असे तास न्यूज एजन्सीने मुराश्को यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

४० हजारपैकी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त जणांना या लशीचे डोस देण्यात आले आहेत. तिसऱ्या फेजमध्ये ४० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल असे रशियाने जाहीर केले होते.

दरम्यान, ही लस आता भारतात उपलब्ध होणार आहे. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने (RDIF) ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे RDIF ने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post