राज्यातील ४८ खासदारांच्या घरासमोर 'तो' आदेश पेटवणार; शेतकरी संघटनेचे २३ ला राखरांगोळी आंदोलन


 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेश पेटवून दिला जाणार आहे. शेतकरी संघटनेद्वारे येत्या २३ रोजी हे राखरांगोळी आंदोलन करण्यात येणार आहे. देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलन करणार असल्य‍ाची घोषणा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनिल घनवट यांनी दिली.


सहा महिने शेतकर्‍यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरून निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी घालून शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली जात असताना शेतकर्‍यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतू खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी होत असल्याची जाणीव त्यांना देण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरासमोर १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून राख करून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटना करणार आहे, असे घनवट यांनी जाहीर केले आहे.


जून महिन्यात केंद्र शासनाने शेती माल व्य़ापार कायद्यात दुरुस्ती करुन शेतीमाल व्यापार खुला करुन कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातुन वगळल्यावर शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंब‍ा ही दिला होता पण तीनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादुन शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post